नदी पात्रात टाकली जातेय मासे आणि कोंबड्यांची घाण ; पाण्यात सुटलेय दुर्गंधी
करमाळा समाचार
कंदर टेंभुर्णी रस्त्यावर असलेल्या पुलावरून नदीपात्रात मासे व कोंबड्याचे कचरा टाकण्यात येत असतो. त्यामुळे पाण्यामध्ये घाण साचून दुर्गंधी सुटत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कुजलेले मास पुढे जात असून त्यातून पाणी दुषीत होत आहे. यावर लगाम लावावा अशी मागणी कंदर येथील रहिवासी इम्रान मुलानी यांनी तहसीलदार यांच्याकडे केले आहे. याबाबतचे पत्र त्यांनी आरोग्य मंत्री व आरोग्य विभागालाही पाठवले आहे.

कंदर गावाजवळ मत्स्य व कोंबड्याचा व्यवसाय करणारे व्यावसायिक हे सदर व्यवसायातून दररोज मत्स्य व कोंबड्याचा जो कचरा निघतो तो कचरा कंदर शिवारात टेंभुर्णी रस्त्यावर असलेल्या पुलावरून नदीपात्रामध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे पाणी दूषित होत आहे. शिवाय त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत दुकानदारांना व पोलिसातही तक्रार देऊन झाले तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे संबंधित लोकांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा इम्रान मुलांनी यांनी दिला आहे.

संबंधित दुकानदारांची तक्रार करतो म्हणून त्या दुकानदारांनी लाथा बुक्क्या मारून शिवीगाळ केली होती. या संदर्भात ५ जुलै रोजी करमाळा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित लोक हे गाव गुंड असून खुनशी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यापासून आपल्या जीवास धोका असल्याचेही अर्जदाराने या पत्रात म्हटले आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार पोलीस निरीक्षक, सरपंच व ग्रामसेवक यांच्यासह संबंधित विभागांना दिले आहे.