उस तोडणीसाठी मजुर पुरवठा करतो म्हणून ठेकेदाराची फसवणुक ; गुन्हा दाखल
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखाना येथे २०२२-२३ मध्ये ऊस वाहतुकीचा करार करण्यासाठी जिल्हा यवतमाळ येथील टोळी प्रमुखाला सात लाख रुपये देऊनही ऊसतोड कामगार पाठवले नाहीत. तर पैसे देण्यासही नकार दिला. सदर प्रकरणात ठेकेदाराची फसवणूक केल्याप्रकरणी ऊस तोडणी तोडणी प्रमुखावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे प्रकरण ऑक्टोबर २०२२ मध्ये घडले होते.

अमोल विजय राठोड रा. भंडारी ता. पुसद जिल्हा यवतमाळ असे गुन्हा दाखल झालेल्या टोळी प्रमुखाचे नाव आहे. तर या प्रकरणी सतीश सुळे रा. कुंभेज ता. करमाळा यांनी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी येथे ऊस तोडणी वाहतुकीसाठी सुळे यांनी करार केला होता. त्यासाठी सुळे त्यांना १४ ऊसतोड मजुरांची गरज होती. त्यामुळे त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील अमोल राठोड यांच्याशी संपर्क साधला. यावेळी मजुरांसाठी बारा लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार सुरुवातीला राठोड याने साडेपाच लाख रुपये रोख रक्कम घेऊन गेला.
तर फोन पे च्या माध्यमातून दीड लाख रुपये नेले होते. त्यानंतर आजतागायत अमोल राठोड यांनी ऊस तोडणी करिता मजूर दिले नाहीत. त्याला वारंवार पैशाची मागणी केली तर “तू माझ्या गावाकडे आला तर तुझे काही खरे नाही” असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर आर्थिक फसवणूक झाल्याचे सुळे यांच्या लक्षात आले. यावरून करमाळा पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करीत आहेत.