मकाईच्या बाबतीत खुशखबर ; शेतकऱ्यांचे थकीत उसबील मिळण्याचा मार्ग मोकळा !
करमाळा समाचार – विशाल घोलप
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या तसेच महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याचे खात्रीलायक वृत्त मिळाले आहे. लवकरच मकाईची देणे दिली जाणार असून सदरची रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे ऊस बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलापोटी आजपर्यंत बरीचशी आंदोलन झाली. त्या आंदोलना नंतरही थकीत ऊस बिल मात्र मिळत नव्हते. त्याशिवाय प्रशासनाने ही संबंधित संचालक मंडळाला याबाबत विचारणा केलेली होती. परंतु तांत्रिक बाबींमुळे कारखान्याचे कर्ज मंजूर होत नव्हते. पण आता सदरचे कर्ज मंजूर होऊन लवकरच पैसे खात्यावर जमा होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी यासंबंधी संचालक मंडळावर गुन्हाही दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण आता दोन्ही बाजूने शेतकऱ्यांसह संचालक मंडळाला ही हा दिलासा म्हणावा लागेल. तर मागील काही दिवसांपूर्वी विकी मंगल कार्यालय येथे झालेल्या प्रचार सभेतही रश्मी बागल यांनी लवकरच माझ्या बाजूच्या कोणत्याही अडचणी शिल्लक ठेवणार नाही असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता सदरची रक्कम लवकरच जमा होईल अशी माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नक्कीच आनंद व्यक्त होईल.