करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

संतश्रेष्ठ निवृत्तीमहाराज पालखी सोहळा ; क्षणचित्रे व आढावा

प्रतिनिधी | करमाळा


माऊली माऊलीचा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण करत सोलापूर जिल्ह्यात रावगाव येथे मानाच्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत झाले. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर शेगुड ता. कर्जत येथील खंडोबा मंदीरापासुन स्वागत झाले यावेळी जेसीबी च्या साहाय्याने पालखीवर पृष्पवृष्ठी करण्यात आली. तर रावगाव पर्यतच्या संपुर्ण रस्त्यावर वारकऱ्यांना रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. झालेल्या स्वागताने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसुन येत होता. यावेळी प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

श्री संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पायी दिंडी त्र्यंबकेश्वर हे सालाबाद प्रमाणे यंदाही दिंडी बुधवारी दुपारी तीन वाजता करमाळा तालुक्यात पोहचली. रावगाव येथे या दिंडीचे स्वागत केले. रावगाव येथे एकाच वेळी मोठी दिंडी व गावात वेगवेगळ्या छोट्या स्टॉल सह प्रशासनाने केलेली सोय पाहुन रावगावला छोट्या पंढरपूरचे स्वरुप प्राप्त झाले होते. वारकऱ्यांना मसाज व शौचालय सोयीसह यंदा छावण्या व स्नानगृहाचीही सोय केल्याने दिंडी प्रमुख निलेश गाढवे यांनी समाधान व्यक्त केले.

सोलापूर व नगर जिल्ह्याच्या हद्दीवर शेगुड व डुकरेवाडी येथे जिल्हा प्रशासनाने पालखीचे स्वागत केले. त्यानंतर साधारण चार किलोमीटरवर रावगावमध्ये पालखी सोहळा पालखी स्थळावर विसवला. पालखी सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष निलेश गाढवे यांच्याकडील माहितीनुसार रथापुढे चार व रथाच्या मागे ४१ अशा ४५ दिंड्यांमधून साधारण ५० हजार वारकरी या पालखी सोहळ्यात आहेत. यामध्ये महिला व युवक वारकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

रावगाव येथे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी प्रशासनाने व्यवस्था केली आहे. यामध्ये महिलांसाठी विसावा शेड उभारण्यात आले आहे. ठिकठिकाणी प्लास्टीक संकलन केंद्र उभारले आहेत. महावितरणकडून विजे नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यावेळी प्रांत माढा विभाग नामदेव टिळेकर, प्रांत करमाळा विभाग समाधान घुटुकडे, तहसीलदार विजयकुमार जाधव, गटविकास अधिकारी मनोज राऊत, महावितरण चे अभियंता सुमित जाधव, पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे आदींनी हजेरी लावली होती. तर करमाळा पासुन पंढरपूर पोलिसांचे एक पथ पोलिस उपनिरिक्षक विनायक माहुरकर यांच्या नेतृत्वाखाली जाणार आहे.

महिला जखमी – प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरोग्य यंत्रणेत जवळपास १००० पेक्षा जास्त वारकऱ्यांनी आतापर्यंत उपचार घेतले आहेत. त्यापैकी दोन रुग्ण गंभीर आढळून आले. त्यामध्ये सुशीला नामदेव शिंदे रा. पालखेड या महिलेला फटाकड्याचा बार उडवल्यानंतर कपाळावरती जबर मार लागल्याने तीन टाके घेण्यात आले. तर एका पुरुषाला अधिक घाम फुटु लागल्याने तिला योग्य उपचार केले आहेत. यावेळी डॉ. शैलेश देवकर, समुदाय आरोग्य अधिकारी अपेक्षा शिंदे, आरोग्य सेवीका सुनिता कोंढार, सुप्रिया बारस्कर यासह पथक काम पाहत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE