पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली ; वरदायिनी मायनस ३६
करमाळा समाचार -संजय साखरे
पुणे , नगर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी वरदानी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळी झपाट्याने घट होत असून आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात आता मायनस ३५.९९ इतका पाणीसाठा राहिला आहे.

दरम्यान दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग पूर्णपणे बंद झाला असून उजनीतून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणारे पाणीही आता बंद करण्यात आले आहे. उजनी धरणात आता फक्त ४४ टीएमसी पाणी शिल्लक असून धरणग्रस्त शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
उजनी बॅक वॉटर परिसरात आडसाली उसाच्या लागणी खोळंबल्या असून खोडवा ऊसाला पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने त्याचे शेंडे करपण्यास सुरुवात झाली आहे. धरण मायनस ४० एवढे झाल्यावर उजनी बॅक वॉटर परिसरात शेतकऱ्यांनी पाण्यासाठी खोदलेल्या चाऱ्याना पाणी येत नाही त्यामुळे आहे ही पिके जगवण्याचे मोठे आव्हान धरणग्रस्त शेतकऱ्यांसमोर आहे.

गेल्या वर्षी १२ जुलै रोजी धरण प्लस मध्ये आले होते यावर्षी मात्र ते वजा ३५.९९ एवढे आहे. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड ही सहन करावा लागत आहे.