जिल्हा नियोजन समीती बैठकीत वीज कपातीवर पोकळ चर्चा ; नारायण आबांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको होणार
करमाळा समाचार
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये करमाळा तालुक्यातील नेत्यांनी आवाज उठवला व त्याला पालकमंत्र्यांनी प्रतिसादही दिला. पण प्रतिसाद दिल्यानंतर पालकमंत्र्यांच्या आश्वासनाला अधिकाऱ्यांनी पाहिजे तितका मनावर घेतलेली दिसत नाही. त्यामुळे आजही ही फक्त दोनच तास वीज असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थगित केलेले आंदोलन पुन्हा एकदा उभारण्याच्या निर्णय माजी आमदार नारायण पाटील यांनी घेतला आहे.

सोमवारी करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी वीज कपात विरोधात बुधवारी रास्ता रोको करीत असल्याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याच दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला नारायण आबा हेही उपस्थित होते. दरम्यान त्या ठिकाणी आबांना बोलण्याची संधी दिल्यानंतर आबांनी तालुक्यातील वीज प्रश्न त्या ठिकाणी मांडला.

त्या वेळी त्यांच्यासोबत इतर आमदारही आपल्या आपल्या तालुक्या संदर्भात बोलत होते. करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनीही सदर बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या व दिवाळीपूर्वी करण्यात येणारी वीज कपात ही चुकीची असल्याचे सांगितले होते.
बैठकीमध्ये मोठी खडाजंगी झाली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही अधिकारांना चांगले सुनावले. बैठकीत एवढी चर्चा झाल्यानंतर विज पूर्ववत होण्याचे वाटू लागल्याने व त्याच बैठकीत पालकमंत्र्यांनी ही सांगितल्याने माजी आमदार नारायण पाटील यांनी बुधवारी होणारे रस्ता रोको आंदोलन स्थगित केले होते. परंतु दोन दिवस उलटले तरी अद्याप वीज पुरवठा करण्यात आलेली नाही. त्यामुळेच आता पुन्हा एकदा नारायणआबांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
बुधवारचे आंदोलन स्थगित झाल्यानंतर आता नव्याने पुन्हा एकदा दोन तासावरून आठ तास वीज नेण्यासाठी कुंभेज फाटा तालुका करमाळा येथे नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. शुक्रवारी सकाळी साडे आकरा वाजता हे आंदोलन होणार असून या आंदोलनात शेतकरी बांधवांनी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.