तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला चालवायला द्या ; लोकप्रतिनिधीसह आगारावर लोकांचा रोष
करमाळा समाचार
करमाळा (आगार) परिवहन महामंडळ तसेच इतर काही आगारातील बसचा होणारा घोटाळा सध्या समाज माध्यमातील चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे नागरिकांमधूनही रोष पाहायला मिळत आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी काय करत आहेत ? तसेच जमत नसेल तर आम्हाला चालवायला द्या अशी मागणी आता लोक करू लागले आहेत. तरीही संबंधित विभागाला अजूनही जाग येण्याचे नाव घेत नाही.

जुने टायर, जुन्या गाड्या, इंजिन खराब विविध कारणामुळे सतत बंद पडणाऱ्या गाड्या यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे लेख कुठेही गाड्या बंद होणे, पंचर होणे या बाबींमुळे लोकांची महत्त्वाची कामे थांबून गाडीची वाट पहावी लागत आहे. पण सोबत गेलेल्या वाहक आणि चालकाला विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बस मध्ये बिघाड झालेली कामेही त्या चालक व वाहकालाच करावी लागत आहेत.

मागील सहा ते सात महिन्यांपासून सोशल मीडियामध्ये बंद गाड्यांनी धुमाकूळ घातला असून याबाबत आता लोक व्यक्त होऊ लागले आहेत. मोबाईलच्या उजेडात धावणारी बस जवळपास पंचवीस लाख लोकांनी पाहिली आहे. तर लोकसभा निवडणुकीत एसटीचा मुद्दाही चर्चेला जाऊ लागला होता. सामान्य लोकांची लाल परी योग्य सेवा देत नसेल खाजगीकरण करण्याच्या दिशेने वाटचाल आहे का ? असेही प्रश्न लोक विचारू लागले आहेत. दिवसातून आजही तीन ते चार ठिकाणी गाड्या बंद पडलेल्या दिसतात. याकडे आजही प्रशासकन लक्ष देत नाही.