इंदापुरच्या वाळु माफियाकडुन भरदिवसा अवैध उपसा ; आठवड्यात दुसरी कारवाई
करमाळा समाचार
तालुक्यातील कुगाव येथे भीमा नदीच्या पात्रातून दोन यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करीत असलेल्या संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्याकडून एकूण बारा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. सदरची कारवाई ३१ मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. भर दिवसा होत असलेल्या वाळू उपसा करून संबंधित यंत्रणा आव्हान देण्याचे काम होत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वीही अशीच एक कारवाई करण्यात आली होती.

या प्रकरणी योगेश डाबरे रा. आजोती, शंकर मोरे रा. नरुटवाडी ता. इंदापूर, एकरामुल बिलाल शेख रा. कुगाव, महाऊर जानुमहम्मद शेख रा. कुगाव व दोन अनोळखी व्यक्ती असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. यावेळी त्यांच्याकडुन दोन लोखंडी बोट १२ लाख, एकुण चार ब्रास वाळु चाळीस हजार असा एकुण १२ लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे. भरदिवसा होत असलेल्या वाळु चोरी मुळे वाळु माफियात प्रशासनाचा धाक राहिला नसल्याचे दिसुन येत आहे. यामागे कोण लोक आहेत हे शोधुन काढणे गरजेचे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, करमाळा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे कुगाव, चिखलठाण क्रमांक दोन या गावचे हद्दीतून भीमा नदीच्या पात्रातून बेकायदेशीर यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू चोरी केली जात आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर करमाळा पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी गेल्यानंतर पाहिले असता भीमा नदीच्या पात्रामध्ये दोन यांत्रिक बोटीच्या सहाय्याने संबंधित लोक वाळू उपसा करीत होते. यावेळी पोलिसांना पाहून त्यातील दोन जण पळून गेले. तर चार जण हाती लागले. सदरची कारवाई दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. यावेळी सदरच्या बोटीमध्ये चार ब्रास वाळू मिळून आली. सदर घटनेचा पुढील तपास कामावर पोलीस करीत आहेत.