निकृष्ट रस्त्याची चौकशी फक्त कागदावरच ; वीट ग्रामस्थांना अहवालाची प्रतिक्षा
करमाळा समाचार
मागील वर्षी जिल्हा परिषद अंतर्गत वीट येथे नागरी सुविधा, जन सुविधा व 14 वित्त आयोग अंतर्गत झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याची एक वर्षातच वाट लागली आहे. झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर चौकशी झाली परंतु चौकशी तब्बल दोन महिन्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वीट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय ते कुंभार वेस, भैरवनाथ नगर, तळे वस्ती पाण्याची टाकी असे चार ठिकाणी टप्प्याटप्प्यात काम पूर्ण करण्यात आले. तब्बल 53 लाख रुपये खर्चून झालेल्या रस्त्यांचे काम निकृष्ट असल्याबाबत ग्रामस्थ तसेच सदस्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. परंतु त्याचा संबंधितांवर कोणताही परिणाम झाला नाही अथवा अधिकारीही गप्प होते.

रस्त्याचे काम पूर्ण होऊन महिना उलटून ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली होती. तक्रारींना केराची टोपली दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा जुन 2021 मध्ये दिला होता. या उपोषणाच्या आंदोलनाची दखल घेत. सदर रस्त्याच्या चौकशीसाठी एक पथक पाठविण्यात आले. त्यापथकात श्री शेळके, जी एस पाटील यांचा उप अभियंता करमाळा पंचायत समिती आले होते.
जून महिन्या नंतर काही दिवसातच आपला अहवाल सुपूर्द केला जाईल असे आश्वासन त्यांच्या वतीने देण्यात आले होते. परंतु आज तब्बल दोन महिने उलटले तरी अधिकारी व त्यांचा अहवाल परत फिरकले नाही. यामुळे सध्या वीट ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांमध्ये याबाबत रोष आहे. लवकर अहवाल सादर न केल्यास पुढील आंदोलनाचा इशारा समाधान कांबळे, ग्रामपंचायत सदस्य जोतीराम राऊत, डॉ. भागवत ढेरे, राजेद्र गाडे, सुभाष आवटे, नवनाथ जाधव, श्रीकांत जाधव यासह मच्छिंद्र जाधव, भाऊ गाडे, विशाल गाडे, सुभाष जाधव, हनुमंत आवटे, नागनाथ आवटे व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
जुलै 2019 मध्ये सर्वसाधारण सभेत ठराव…
करमाळा पंचायत समिती सभापती अतुल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पंचायत समितीच्या वतीने संबंधित रस्त्याबाबत विषय मांडला होता. यावेळी त्रिसदस्यीय समिती नेमण्याची आवाहन केले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्याप ते पाळण्यात आलेले नाही.