ग्रामसुरक्षा दल सक्रिय होताच झटपट रिजल्ट ; फायदेशीर ठरतेय समीती
करमाळा समाचार
तालुक्यात संभावित धोका किंवा अपघात टाळण्यासाठी लोकांना सक्रिय ठेवण्यासाठी ग्राम सुरक्षा समीतीची गावोगावी स्थापना करण्यात आली. त्याचा फायदा सुरुवातीलाच होताना दिसत आहे. शाळा संपल्यावर कामाच्या शोधात घर सोडुन गेलेल्या औदुंबर राऊतला (वय १६) रा. कुंभारगाव ता. करमाळा माघारी आणण्यात ग्राम सुरक्षा यंत्रेणेचा मोठा फायदा झालेला दिसुन आला आहे. सात दिवसाच्या आत औदुंबर ला शोधण्यात आले आहे.

कोरोनामुळे शाळा बंद होत्या घरात बसुन कंटाळलेल्या औदुंबर राऊत याने कामाच्या शोधात पुणे गाठले व काम करु लागला. पण जात असताना त्याने सदरचा प्रकार घरच्यांच्या कानावर घातला नव्हता. एकटाच घरातुन अचानक निघुन गेल्याने कुटुंबीय चिंतेत होते. औदुंबर हा दि १५ रोजी घरातुन निघुन गेला होता. करमाळा पोलिसात याप्रकरणी तक्रारही दाखल केली होती. चार ते पाच दिवस शोध ही घेतला वेगवेगळ्या गावात कुटुंबीय शोध घेत होते. समाजमाध्यमातुन फोटो व माहीती सर्वत्र पसरवली जात होती. पण तो मिळुन येत नव्हता. शोध घेतला तरी पत्ता लागत नव्हता.

कुटुंबीयांनी गावातील पोलिस पाटील अतुल राऊत यांच्याशी संपर्क केला. पोलीस पाटील यांनी त्याचे वर्णन विचारले आणि ही माहिती ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे प्रसारित केली. काही क्षणातच ही माहिती गावभर तसेच उपजीविकेसाठी तालुका सोडुन बाहेर गेलेल्या नागरिकांना मिळाली. दि.२४ रोजी सोनू हडपसर येथे शिवरत्न नामदेव फरांडे याला दिसला. औदुंबर बेपत्ता असल्याची कल्पना असल्यामुळे त्याला संशय आला. त्यामुळे त्याने व्हिडिओ काढून किरण राऊत याला पाठवला. ओळख पटताच सामाजिक कार्यकर्ते सुग्रीव बनकर व अभिजित काळे त्या ठिकाणी पोहोचले व औदुंबरला ताब्यात घेतले. त्याच्या घरच्यांशी फोनवरून संपर्क करून त्याला त्यांच्या स्वाधीन केले. अशाप्रकारे तत्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर केल्यामुळे सोनू सुखरूप मिळाला व पुढचा अनर्थ टळला आहे.