करमाळ्याच्या विवाहीतेचा कंडक्टर पतीसह सासरच्या मंडळीकडुन जाचहाट
करमाळा समाचार
लग्नामध्ये माहेरच्या लोकांनी व्यवस्थित पाहुणचार केला नाही. त्याशिवाय घर बांधण्याकरता माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून जाचहाट करून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी नवऱ्यासह सहा जणांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रियांका तोंडे यांनी तक्रार दिली आहे.

प्रियंका या एसटी कॉलनी येथे राहत होत्या. त्यांचं लग्न 2021 मध्ये पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे येथील प्रवीण बापू तोंडे यांच्यासोबत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लावण्यात आले होते. यावेळी प्रियंका यांच्या वडिलांनी संसार उपयोगी भांडी व इतर साहित्य दिले होते. प्रवीण तोंडे हे एसटी महामंडळ इंदापूर येथे कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत.

याप्रकरणी प्रवीण तोंडे, बापू तोंडे, अरुणा तोंडे, शिवराज तोंडे, स्वाती तोंडे सर्व रा. वाभळे वस्ती, भागवतवाडी, पाटस, रूपाली करे धनकवडी जिल्हा पुणे या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे.
2021 ला लग्न झाल्यापासून पाच महिन्याच्या अंतरानेच सासू, जाऊ व दिर यांनी घरात राहू नको म्हणून दमदाटी केली होती. तर लग्नात पाहुणचार व्यवस्थित झाला नाही म्हणून घालून बोलणे सुरू होते. दरम्यानच्या काळात प्रियंका या सासरीच राहत होत्या. सर्व त्रासाला कंटाळुन त्यांनी पती इंदापूरला नोकरीस असल्याने त्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले. तर पगार कमी आहे आई-वडिलांकडून इंदापूर मध्ये घर बांधायला पाच लाख रुपये घेऊन ये मग राहायला जाऊ असे पतीनेही सांगितले.
नंतर प्रियांका यांना मुलगा झाला. त्यावेळी माहेरी पाच महिने राहून 2022 मध्ये सासरी गेल्यावर किरकोळ कारणावरून पती वारंवार मारहाण करत होते. यासह इतर अनेक कारणांमुळे जाटहाट सुरू होता. त्यामध्ये या सर्वांचा सहभाग होता असे फिर्यादीत नमूद केले आहे. यावरून पती, सासू , सासरे, नणंद, दीर, जाऊ यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.