आगार प्रमुखांकडुन आंदोलनकर्त्यांची दिशाभुल ; लेखी उत्तरात मागणी मान्य पण प्रत्यक्षात बेजबाबदार
करमाळा – विशाल घोलप
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एसटी मधील विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावर संबंधित विभागाच्या वतीने उत्तरही देण्यात आले. पण केवळ आंदोलन दडपण्यासाठी थातुरमातुर उत्तरे दिल्याचे एका प्रकरणातुन स्पष्ट झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे संगम चौकातून एसटी पाठवणार नसल्याचं लिहिले होते परंतु अवघ्या चौथ्या दिवशी त्याच ठिकाणी एसटी बंद पडल्याने आगाराचा कारभार उघडकीस आला आहे.
मुळातच जुन्या आणि बंद पडणाऱ्या बसेसमुळे नागरिक प्रवासी हैराण आहेत. वारंवार कुठे ना कुठे संबंधित एसटी गाड्या बंद पडतात. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष वरिष्ठ पातळीवरूनही केले जात आहे. त्यासाठी नवीन बसेस मागवण्याची मागणी असतानाही करमाळा तालुक्यात मात्र नवीन बस मिळताना दिसत नाहीत.
काही दिवसांपूर्वी एका बसचा रावगाव येथे अपघात झाला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यशपाल कांबळे यांनी संबंधित बसच्या बिघाडावरून प्रश्न विचारले होते. त्यावर आंदोलनाचा इशाराही दिला. याशिवाय संगम चौकातून रहदारी अडथळा निर्माण होत असून वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे गाड्या दुसऱ्या मार्गाने पाठवाव्यात अशी ही मागणी कांबळे यांच्या वतीने करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना केवळ आंदोलनाच्या भीतीने सारवासारव केल्याचे दिसून आले. नेमकी किती मदत जखमींना केली किंवा बसची मुदत अजून किती बाकी आहे याशिवाय कोणत्या कर्मचाऱ्यावर व काय कारवाई केली व कशामुळे या संदर्भात केवळ काम चलाऊ उत्तरे दिल्याचे दिसून आले.
तर आज सकाळी करमाळा बस आगारातून पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी निघालेली गाडी आगाराच्या बाहेर पडते तोपर्यंतच बंद पडल्याची दिसून आली. विशेष म्हणजे सदरची गाडी ज्या रस्त्यावरून न जाण्यासाठी पत्रात उल्लेख केला त्याच मुख्य चौकात गाडी बंद पडल्याची दिसून आली. त्यामुळे इतर गाड्यांचाही खोळंबा होताना दिसून आला. त्यामुळे बंद पडणाऱ्या गाड्या या लांब पल्याला पाठवल्या जातच आहेत शिवाय ज्या रस्त्यावरून जाणार नाही याची स्वतः कबुली दिल्यानंतर ही त्याच रस्त्यावर गाडी बंद पडल्याने आगार प्रमुखांनी वेळ मारून नेण्यासाठी दिलेलं उत्तर कशा पद्धतीने दिशाभूल करणार आहोत हे दिसून आले.