E-Paperकरमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

लग्नाला जाताना कर्जत तालुक्यात अपघात खांबेवाडीचे मामा – भाचा ठार

करमाळा समाचार

नातेवाईकाच्या लग्नाला जात असताना मोटरसायकल व पाण्याच्या टँकर सोबत झालेल्या धडकेत करमाळा तालुक्यातील मामा भाचे ठार झाले आहेत. याप्रकरणी टँकर चालकावर कर्जत ता. कर्जत जि. अहमदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार दि २८ रोजी दुपारी दीडच्या सुमारास करमाळा कर्जत रस्त्यावर कोरेगाव शिवारात राधेश्याम मंगल कार्यालय पासून काही अंतरावर घडला आहे.

सदरच्या अपघातात हिंदराज फुलचंद हाके (वय ३०) व अमित रामदास सूळ (वय १४) रा. खांबेवाडी ता. करमाळा असे मामा भाचे मयत झाले आहेत. याप्रकरणी नारायण बाळासाहेब गरड निंबोडी ता. कर्जत जि. अहमदनगर यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमित हा संगोबा येथील शाळेत शिक्षण घेत आहे तर मामाच्या गावी तालीम करीत होता. हिंदराज सोबत भाचा अमित हा खांबेवाडी ता. करमाळा येथे राहण्यास होता. रविवारी कर्जत तालुक्यांमध्ये नातेवाईकाच्या लग्नासाठी दोघेजण मोटरसायकलवर निघाले होते. दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास पाण्याचा टँकर वाहणाऱ्या ट्रॅक्टर सोबत हिंदराज हाके यांच्या मोटरसायकलची धडक झाली.

अपघात एवढा जोराचा होता की भाचा अमित हा जागीच ठार झाला. तर हिंदराज हाके यास पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी उपचारादरम्यान हिंदराजचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती करमाळा तालुक्यात मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर सदर घटनेची तक्रार दिल्यानंतर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याचे हवालदार प्रदीप बोराडे हे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE