पिकांसाठी पाणी सोडा अन्यथा पीक जळण्याचा धोका ; शेतकऱ्यांची आर्त हाक
करमाळा समाचार
भोत्रा को.प. बंधाऱ्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी पीक, ऊस, भुईमूग या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. तरी पाणी सोडण्या विषयी शीघ्र गतीने कारवाई करावी अशी मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता कार्यालय परांडा यांना सीना कोळगाव धरणातून भोत्रा बंधाऱ्यात उन्हाळी आवर्तन पाणी सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. सदरचे निवेदन आवाटी व नेरले परिसरातील शेतकऱ्यांनी दिले आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी पीक,ऊस, भुईमूग या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. या बंधार्यावर मौजे आवटी,रोसा,नेर्ले, भोत्रा, मुंगशी, लोणी, परांडा इत्यादी गावचे लोक लाभ क्षेत्रात येत आहेत. बंधाऱ्याच्या सिंचना योग क्षेत्र 383 हेक्टर एवढे असून बंधाऱ्याची साठवण क्षमता 2.95 दलघमी येवढी आहे. गेले पंचवीस दिवस झाले आवाटी येथील नदी पात्र कोरडे असून या हंगामातील पहिले आवर्तन दिनांक चार एप्रिल रोजी सोडण्यात आले होते.

आज रोजी नदी व बंधाऱ्यात पाणी नसून कोरडी पडला आहे. उन्हाळी पीक वाचवण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून आपल्या कार्यालयाने तात्काळ पाणी सोडण्यासाठी आवश्यक कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करावी व सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सदर निवेदनावर रामचंद्र शिंदे, मोहसीन पटेल, साजिद मुलानी, कौसर शेख, नानासाहेब बंडगर, बिभिशन पन्हाळकर, बन्सी पन्हाळकर, अंकुश लोभे, अशोक नाईक, शौकत पटेल, उत्तम पन्हाळकर आदिसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.