करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीला राष्ट्रवादीचा पुढाकार ; जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील तहसीलदारांच्या भेटीला

करमाळा समाचार

सीना नदीला आलेल्या पुरामुळे करमाळा तालुक्यातील १७ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. शासनाने खरडून गेलेल्या शेतजमिनींसाठी प्रति हेक्टरी ३ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर केली असतानाही अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव अद्याप शासनाकडे पाठविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पल्लवी सूर्यकांत पाटील यांनी करमाळा तहसीलदारांकडे निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष अमरजित साळुंके, आदिनाथचे संचालक डॉ. अमोल घाडगे, उपाध्यक्ष निलेश झोळ-पाटील, सरचिटणीस सुरेश शिंदे उपस्थित होते.

सीना नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या १७ गावांमध्ये खडकी, आळजापूर, बिटरगाव (श्री), तरडगाव, निलज, बाळेवाडी, पोटेगाव, बोरगाव, करंजे, भालेवाडी, दिलमेश्वर, मिरगव्हाण, हिवरे, निमगाव (ह), कोळगाव आणि आवाटी या गावांचा समावेश आहे. या गावांतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्या असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

विहिरींच्या गाळाचा १५ हजारांचा दुसरा हप्ता द्या
पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. विहिरीतील गाळ काढण्यासाठी शासनाकडून ३० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून त्यापैकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. मात्र, उर्वरित १५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता अद्याप प्रलंबित आहे.

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या जमिनींचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावेत तसेच विहिरीतील गाळ काढण्यासाठीचा प्रलंबित १५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी राजुरीचे माजी सरपंच आबासाहेब टापरे, ॲड. सविता शिंदे, ॲड. प्रशांत बागल, वैजीनाथ तरंगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE