राज्यात ब्रेक द चैन साठी नवीन नियमावली ; लग्न समारंभात उल्लंघन ५० हजार दंड
करमाळा समाचार – वृत्तसंस्था
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांनी काल (मंगळवारी) राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत दिले होते. आज अखेर यावर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यात १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला असून उद्यारात्री ८ वाजल्यापासून ते १ मेच्या सकाळी ७ पर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारची नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन लावण्याबाबत एकमताने चर्चा झाली. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘उद्या रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत घोषणा करतील.’ पण काल रात्री कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधले.

त्यावेळी मोदी म्हणाले की, ‘आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. राज्यांनी शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा,’ असा सर्व राज्यांना सल्ला दिला. पण राज्य सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अखेर लॉकडाऊनचा पर्याय निवडला. राज्यातील पुढील १० दिवसांसाठी कडक लॉकडाऊन असणार आहे.
राज्यातील या लॉकडाऊन दरम्यान राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये १५ टक्के उपस्थितीत सुरू राहणार आहेत. यापूर्वी ही उपस्थिती ५० टक्के इतकी होती. पण आता ती आणखी कमी करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बस वाहतूक ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. लग्न समारंभ हे २५ लोकांच्या उपस्थितीत करून २ तासांमध्ये संपूर्ण सोहळा उरकवा, असे ब्रेक द चेनच्या नव्या नियमावलीत सांगण्यात आले आहे.
नवे कडक निर्बंध पुढीलप्रमाणे.
लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास ५० हजार दंड
लग्नात फक्त २५ लोकांना परवानगी. एकाच हॉलमध्ये २ तास कार्यक्रम
आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी
मुंबईत खासगी गाडीत प्रवास ५० टक्के क्षमतेने
सरकारी कार्यालय १५ टक्के क्षमतेने
खासगी बसेस ५० टक्के क्षमतेने
लोकल ट्रेनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश. आयकार्ड तपासून तिकिट द्यावं
४ तास काय सुरू राहणार?
राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, मिठाईचे दुकानं, सर्व खाद्य दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह ), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील.