पेप्सी विक्रेता ते मोठे व्यापारी ; तालुक्यातील दोन होतकरु युवकांच्या नेत्रदिपक यशाची कहाणी
करमाळा समाचार
तालुक्यातील दोन होतकरू भावंडांनी युवकांना आदर्श ठरावे असे काम करून दाखवले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाची देखभाल करत सामान्य पेप्सी विक्रेता ते मोठे व्यापारी असा प्रवास या दोन भावंडांनी साधला आहे. दोघांनी उज्वल यश संपादन केले आहे. त्यांचे हे यश नेत्रदीपक असून युवकांना एक मार्गदर्शक ठरणार असं यश आहे.
पुनवर तालुका करमाळा येथील अमोल रामदास साबळे व युवराज रामदास साबळे या दोन बंधूंनी एकाग्रता व जिद्दीच्या जोरावर परिस्थिती बदलता येते हे दाखवून दिले आहे. गावाकडे दीड एकर जिरायत जमीन असलेले हे कुटुंब दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीवर अवलंबून न रहाता छोटा मोठा व्यवसाय करू लागले.
सुरुवातीला साबळे बंधू हे सायकलवर पेप्सी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी गावातीलच भाऊ थोरवे यांच्याकडून पेप्सी घेत व बाहेर विक्री करत असत. त्यातून त्यांना धंद्याची गोडी लागली व नंतर एक एम ए टी गाडी घेऊन तालुका भर कुल्फी, काकडी व फळभाज्या विकण्याचे काम त्यांनी सुरू केले.
त्यानंतर व्यवसाय वाढल्यामुळे त्यांनी पुढे जाऊन ॲपे रिक्षा विकत घेतली. त्या ॲपे रिक्षातून बटाटे, वांगे यासारख्या फळभाज्यांना तालुका भर फिरून विक्री करू लागली. तसेच ठिकठिकाणीच्या बाजारही ते करू लागले. यातून त्यांचं उत्पन्न वाढल्याचे त्यांनाही जाणून येत होते.
त्यानंतर त्यांनी एक पिकअप घेतली. त्यामध्ये कलिंगड व खरबूज विक्री करून ते व्यवसाय वाढवत चालले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी कांद्याच्या गाड्या पाठवल्या. त्यामध्ये त्यांना बराचसा फायदा झाला. असंच एकापाठोपाठ एक प्रगती करत असलेला व्यवसाय दोघे बंधू करीत होते. या जिद्दी व कर्तबगारीमुळे आज कुटुंब पेप्सी विक्रेते ते मोठे व्यापारी अशा स्वरूपात त्यांची गावात कौतुक होत आहे. त्यांच्याकडे आज दुचाकींशिवाय दोन स्कॉर्पिओ गाड्या व स्वतःच ऑफिस उभा राहिले आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक त्यांचेच गावातील मित्र संदीप थोरवे यांनी केले आहे. थोरवे म्हणता दोघे बंधु आज इतके मोठे झाले तरी त्यांनी गरिबी बघितलेली आहे. त्यांच्या स्वभावात आजही काहीच बदल झाला नाही त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती केली पाहिजे.