वीज खंडीत केल्याने शेतकऱ्यांचे करोडोंचे नुकसान ; शेतकऱ्यांचे घरदार सोडून तहसील समोर आमरण उपोषण
करमाळा समाचार

तालुक्यातील मांगी तलावाचे परिसरातील वीज खंडित केल्यामुळे करोडो रुपयांचं नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने वडगाव सह इतर 8 गावातील शेतकऱ्यांचे दोन तरुणांकडून प्रतिनिधित्व करण्यासाठी आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदरचे आंदोलन मागील दोन दिवसांपासून सुरू असून या ठिकाणी तालुक्यातील विविध गटातटाच्या नेत्यांनी भेटीगाठी दिल्या असल्या तरी अद्याप तोडगा मात्र निघाला नसल्याचे दिसत आहे.

परिसरात एकूण 3563 हेक्टर उसाचे तर 395 हेक्टर केळीचे क्षेत्र आहे. यासह 445 हेक्टर चारा क्षेत्र असून उसाचे क्षेत्राचे बाजारभावाप्रमाणे ऐशी कोटी 47 लाख रुपये तर शंभर कोटी 85 लाख रुपये केळीचे क्षेत्र सध्या पाण्याअभावी जळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोन पिकासह शेतकऱ्यांची एकूण 198 कोटी 65 लाख 55 हजार रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदरचे नुकसान हे केवळ मांगीतलावावर अवलंबून असणाऱ्या गावांची होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाकडून दुष्काळ नुकसान भरापाई नावाखाली तुटपुंजी अशी मदत जाहीर केली गेली आहे. परंतु करोडो रुपयांचे नुकसान भरपाई कोण करणार? हा मोठा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा या परिसरातील मांगी तलाव सीना धरण कोरडे ठाक पडले होते. पण तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एवढ्या गंभीर स्वरूपात निर्माण झालेला नव्हता. जेवढा यंदा शासनाच्या वतीने दाखवला जात आहे. मुळातच शेतकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याऐवजी पिकं जगवण्याची धडपड सध्या दिसून येत आहे. यासाठी वडगाव दक्षिण येथील तरुण संदीप काळे, विकास गायकवाड हे उपोषणाच्या मार्ग अवलंबून सध्या बसलेले आहेत.

मागील दोन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर बसलेल्या या तरुणांकडे प्रशासनाच्या वतीने कानाडोळा केला जात आहे. मुळातच तालुका पातळीवरील तहसील कार्यालय असेल किंवा महावितरण कार्यालय असेल दोन्ही कार्यालय हे निर्णय घेऊ शकत नाहीत. यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली होऊन निर्णय होणे गरजेचे आहे. तालुक्यात गल्लोगल्ली असलेले मोठमोठी नेते हे जिल्हा पातळीवर काम करताना दिसतात पण अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही नेत्याची ताकद पोहोचत नसेल तर हे दुर्दैव आहे असे मत शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.


