शास्त्रोक्त पद्धतीने ऊस लागवड केल्यास उत्पादन वाढ शक्य -कृषिरत्न डॉ संजिव माने
करमाळा समाचार -संजय साखरे
उसासारख्या शाश्वत उत्पन्न देणाऱ्या नगदी पिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास एकरी 150 टनापर्यंत ऊस उत्पादन घेणे शक्य आहे असे प्रतिपादन आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील कृषी भूषण, कृषी रत्न शेतकरी संजीव दादा माने यांनी केले.कमला भवानी शुगर लिमिटेड पांडे, तालुका करमाळा या साखर कारखान्याच्या वतीने आज सकाळी बोरगाव येथे आयोजित केलेल्या ऊस पीक परिसंवाद मेळाव्यात डॉ.संजीव माने बोलत होते.

ऊस शेतीमध्ये जमिनीची सुपीकता ,ऊस लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खताची मात्रा, पाण्याचे योग्य व्यवस्थापन व पीक संरक्षण या पंचसूत्रीचा अवलंब केला तर उसाच्या एकरी उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो असे त्यांनी सांगितले.
ऊस शेतीतील स्वतःचे अनुभवाबद्दल सांगताना ते म्हणाले की, मला सुरुवातीला एकरी 20 ते 22 टनच उत्पादन मिळायचे त्यानंतर ते 50 ते 55 टनापर्यंत गेले आणि त्यानंतर पुढील वर्षीच ते एकरी शंभर टना पर्यंत गेले. आता सध्या मी 150 टनापर्यंत एकरी ऊस उत्पादन घेतो. ऊस उत्पादन वाढीसाठी वरील पंचसूत्रीचा वापर केल्यामुळे हे शक्य झाले .तर आमच्या भागात 150 टना पर्यंत उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत .त्यांचा राजाराम बापू पाटील कारखान्याच्या वतीने सन्मान केला जातो .ऊस हे जमीनी तील अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात शोषून घेणारे खादाड पीक असून त्याला मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्याची आवश्यकता असते. त्यामुळे ऊसाला रासायनिक खता ऐवजी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा म्हणजे शेणखताचा जर वापर केला तर उसाच्या उत्पादनात वाढ होते असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोरगावचे सरपंच दीपक भोज,मा. सरपंच विनय ननवरे , किसन भोज, वाघाची वाडीचे सरपंच देविदास वाघ ,प्रगतशील बागायतदार संभाजी ढवळे, भीमराव गायकवाड, साहेबराव घाडगे ,संभाजी डवले ,सुधीर भोगल, संतोष शिंदे ,विलास मोरे शेळगाव, सोमनाथ खरसडे तांदुळवाडी ,स्वानंद पवार गोसावी वाडी, प्रदीप सूर्यवंशी बंगाळवाडी, काका भोगल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे जनरल मॅनेजर (केन )श्री भारत रोकडे साहेब यांनी केले तर आभार बोरगाव चे माजी सरपंच विनय ननवरे यांनी मानले .यावेळी कमलाभवानी साखर कारखान्याच्या शेती विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी व बोरगाव आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.