करमाळा तालुक्यासाठी अभिमानास्पद ; पोथऱ्याच्या झिंजाडेंना मिळणार लाखमोलाचा पुरस्कार
समाचार
विधवा प्रथा निर्मूलनाचे कार्य केल्याबाबत करमाळा तालुक्यातील पोथरे येथील प्रमोद झिंजाडे यांना महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका ) साहित्य व समाजकार्य पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार २८ जानेवारी २०२३ रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सुपूर्द केला जाणार आहे. प्रमोद झिंजाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील नऊ जणांना पुरस्कार दिले जाणार आहे. झिंजाडे यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारामध्ये एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपात पुरस्कार दिला जाणार आहे.

मागील आठवड्यात (दि १२) महाराष्ट्र फाउंडेशन यांचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर झिंजाडे यांच्यावर करमाळा तालुक्यात कौतुकांचा वर्षाव झाला आहे. करमाळा तालुक्यातून विधवा प्रथा निर्मूलनाची जनजागृती राज्यभर झाली. विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रमोद झिंजाडे यांनी स्वतःपासून सुरुवात करीत आपल्या मृत्यूनंतर पत्नीने अनिष्ठ प्रथा पाळू नये यामध्ये सौभाग्य अलंकार उतरू नयेत व इतर बंधने पळु नयेत असे प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते.

त्यांच्या या भूमिकेनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामसभेने तसा ठराव केला. गावात विधवा प्रथा बंद केली. या ग्रामसभेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने १७ मे रोजी परिपत्रक काढून राज्यातील सर्व ग्रामपंचायतला या ठरावाचे अनुकरण करण्यास सांगितले. याला सांगोला तालुक्याने प्रतिसाद देत संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीचा ठराव केला आहे.