शुभमंगल सावधान… फसवणुक होण्याची शक्यता असल्याने आर्थीक व्यवहार टाळावे
करमाळा समाचार –
सध्याच्या काळात मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झालेली दिसून येते. तसेच ग्रामीण भागात मुली देण्यासाठी टाळाटाळ सुरू असून शेतकरी असलेल्या मुलाला मुली दिली जात नाही. नोकरी असेल तरच मुली देण्याची अनेकांची इच्छा असते. आधीच मुलींची कमतरता त्यात अधिक अपेक्षा यामुळे आता ग्रामीण भागातील मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. हीच गत काही प्रमाणात शहरी भागातील मुलांची आहे. व्यवसाय असेल तर शेती नसल्यामुळे मुले दिल्या जात नाही अशा परिस्थितीत आता फसवेगिरी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे ग्रुप काढण्यात आले आहेत. त्यामध्ये वधु वर सुचक ग्रुपच्या माध्यमातून मुलांच्या पालकांशी संपर्क केला जातो. त्यांच्याकडून काही रक्कम मागणी केली जाते. 1000 पासून पाच हजार रुपयांपर्यंत ही रक्कम घेतली जात आहे. शेकडो पालक अशा जाळ्यांमध्ये फसत चालले आहे. सदरची रक्कम घेतल्यानंतर मुली दाखवणे तर दूरच पण संबंधित व्यक्ती पुन्हा संपर्क ही टाळू लागले आहेत. अशामुळे नेमके कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

रक्कम थोडीच असल्याने शिवाय संबंधित व्यक्ती हा इतर ग्रुप वर आलेले मेसेज फॉरवर्ड करून फक्त माहिती पुरवतो. पण पुढे मुलांना मुली दाखवणे व मिळवून देणे यासाठी घेतलेली पैसे असतानाही तसे होताना दिसून येत नाही. तरीही संबंधित पालक हा तक्रार करू शकत नाही. केवळ 1000 ते 5000 रुपयांसाठी कशाला कोणाची तक्रार व हेलपाटे मारायचे या उद्देशाने तो गप्प बसतो. पण यामुळे फसवणूक करणाऱ्या लोकांचे फावत आहे अशा लोकांमुळे रोज शेकडो पालक गंडवले जात आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तर काहींचा मुली मिळवून देण्यासाठी लाखो रुपयांचा व्यवहार सुरू..
काही लोक मध्यस्थींच्या नावाखाली आंतरजातीय विवाहही लावून देत आहेत. घरी कुटुंबातील मुलीला चांगल्या घरातील स्थळ मिळावे ही त्या मुलीची इच्छा असते. त्यामुळे ते मोफत आपल्या मुलीला पाठवण्यासाठी तयार असतात. पण जो मध्यस्थी आहे तो पालकांच्या संमतीशिवाय पुढील स्थळाला बोलणी करतो व मुलीचे घरचे काही रक्कम मागत असल्याचे सांगतो. त्यामुळे एक लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेतली जात असल्याचे दिसुन येते. तर काही प्रकरणात मुद्दामहून पैसे घेऊन नवरीच पळून गेल्याच ही समोर आले होते. तर काही आजही आपल्या सासरी टिकून आहेत. पण त्यांच्या घरी कधीच कोणता पैसा पोहोचलेला नसताना सासरच्या मंडळींकडून त्याबाबत ऐकून घेण्याची वेळ येऊ शकते. त्यातून मानसिक त्रास होऊ शकतो याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.