संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनात वांगीचे सोमनाथ खराडे यांना स्टार्टअप सन्मान
करमाळा समाचार
पुणे येथे झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनात करमाळा तालुक्यातील वांगी नंबर ३ येथील युवा उद्योजक एसके इंजिनीअर्स अँड सर्व्हिसेस चे सर्वेसर्वा सोमनाथ खराडे यांचा उद्योग क्षेत्रातील स्टार्टअप सन्मान देऊन गौरव करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखली जावी यासाठी इथून पुढे संभाजी ब्रिगेड काम करणार आहे.

मराठा समाजाच्या युवकांनी ज्या हातांनी आंदोलने केली, ज्या हातांनी संघर्ष केला त्याच हातांनी आता बिझनेस करून पैसे कमवून आर्थिक सबल होण्यासाठी इथून पुढच्या काळात संभाजी ब्रिगेड काम करणार आहे. त्यामुळेच या रौप्यमहोत्सवी अधिवेशनात संभाजी ब्रिगेडने मराठा समाजातील बिझनेस करू पाहणाऱ्या तरुणांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आपल्याच समाजातील उद्योग धंद्यामध्ये स्टार्टअप करून यशस्वी झालेल्या काही युवा उद्योजकांचा सन्मान करून गौरव केला.
या कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार , छत्रपती शाहू महाराज, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता भरत जाधव, अभिनेता अशोक समर्थ, सकाळ समूहाचे संपादक श्रीराम पवार, मिटकाॕन चे संचालक गणेश खामगळ, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, अभिनेता निखिल चव्हाण आदी उपस्थित होते.

प्लॅस्टिक बंदी यशस्वी करण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून सोमनाथ खराडे यांच्या एसके इंजिनीअर्स अँड सर्व्हिसेस या कंपनीने नुकतीच कापडी पिशवी वेंडींग मशीन तयार केली आहे. ही मशीन महाराष्ट्रातील जवळपास सर्वच नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रांमध्ये बसवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट द्वारे ही कापडी पिशवी मार्केटच्या ठिकाणी अगदी सहजपणे उपलब्ध होणार आहे.
याशिवाय घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनामध्ये ही त्यांचे उल्लेखनीय असे काम आहे. नगरपालिकेचे डी पी आर बनवणे, कचरा डेपो वर लागणारे ओला कचरा श्रेडर मशीन, प्लॅस्टिक कचरा श्रेडर मशीन, बेलिंग मशीन, पेट बॉटल क्रशर मशीन, कन्वेयर बेल्ट, इको कंपोस्ट मशीन, ड्रम कंपोस्ट मशीन, बायोगॕस प्लान्ट उभारणे, STP, FSTP, कंपोस्ट खत स्क्रिनिंग मशीन इ. मशीन पुरविणे, बसविणे आणि मेंटेनन्स ची कामे एसके इंजिनीअर्स अँड सर्व्हिसेस च्या माध्यमातून केली जातात. त्याचबरोबर कचरा डेपो वर लागणारे बायो कल्चर, ओडोफ्रेश बायोलाॕजिकल व इतर केमिकल्स पुरविण्याचे काम देखील केले जाते. आज महाराष्ट्रातील जवळपास १३ नगरपालिका आणि २ महानगरपालिका तसेच विविध ग्रामपंचायती व हाऊसिंग सोसायटी मध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन चे काम एसके इंजिनीअर्स अँड सर्व्हिसेस च्या माध्यमातून चालू आहे.
सोमनाथ खराडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वांगी ३ व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल वांगी नंबर ३ येथेच झाले तर ज्युनियर कॉलेज कर्जत येथील महात्मा गांधी महाविद्यालयात झाले. त्या ठिकाणी त्यांना प्रा. पठाण मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. अतिशय गरीब आणि हलाखीच्या परिस्थिती मधून त्यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण SVPM’s कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग माळेगाव (बारामती) येथून २०१३ साली पूर्ण केले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना त्यांचे मावस भाऊ वांगी नंबर १ येथील दशरथ पांडे यांचे त्यांना फार मोलाचे सहकार्य लाभले. अर्थात मावस भावाने आर्थिक पाठबळ दिले म्हणूनच ते इंजिनिअरिंग ची पदवी पूर्ण करू शकले. इंजिनिअर होऊन ही नोकरीत त्यांचे मन कधी रमलेच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचे विश्व उभे करण्याचे ठरवले आणि यातूनच पुढे एसके इंजिनीअर्स अँड सर्व्हिसेस या कंपनीचा उदय झाला. कंपनीची वाटचाल फक्त महाराष्ट्र राज्यापुरतीच मर्यादित न ठेवता येत्या काळात संभाजी ब्रिगेडच्या तत्वानुसार अहद ऑस्ट्रेलिया ते तहद कॅनडा पर्यंत पोहोचवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.
माझ्या आयुष्यातील हा पहिला सन्मान मी माझे दिवंगत वडील कै. बाळू दिगंबर खराडे यांना समर्पित करतो. कारण घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असताना देखील समाजातील अनेक घटकांचा विरोध झुगारून माझ्या वडिलांनी मला नोकरी मध्ये न अडकून राहता स्वतःचा व्यवसाय करण्याची प्रेरणा दिली आणि हा व्यवसाय सुरू करीत असताना सुरुवातीच्या काळात आलेल्या काही चढ – उतारां मध्ये माझी आई आणि मोठा भाऊ नागेश दादा यांनी देखील मला कायम साथ दिली. तसेच हा व्यवसाय वाढवत असताना आलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी माझी पत्नी सौ. निता हिने देखील मला मोलाची मदत केली. त्याच बरोबर माझा हा बिझनेस वाढवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून ज्यांचे मला मोलाचे सहकार्य लाभले असे माझे गुरुसमान मित्र परिमल साळुंखे सर या सर्वांचा मी कायमस्वरूपी ऋणी राहील व हा सन्मान फक्त माझाच नाही तर या आम्हा सर्वांचाच आहे असे मी मानतो. येत्या काळामध्ये मी माझ्या गावातील किंवा माझ्या तालुक्यातील तसेच समाजातील इतरही सर्व उद्योग क्षेत्रांमध्ये नव्याने स्टार्टअप करू पाहणाऱ्या नव उद्योजकांना लागेतोपरी सर्व मार्गदर्शन व मदत करायला तयार आहे.
– सोमनाथ बाळू खराडे (एसके इंजिनीअर्स अँड सर्व्हिसेस, पुणे)
मो. ९९७५७०७५४४