शाळा शिकण्यासाठी विद्यार्थी बसले उपाशी ; तरीही प्रशासनाला पाझर फुटेना
करमाळा समाचार
करमाळा हिवरवाडी रस्त्यासाठी वारंवार आंदोलन व इशारा देऊनही प्रशासनाला गांभीर्य असल्याचे दिसून आले नाही. ५ ऑक्टोंबर रोजी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज विद्यार्थी उपोषणासाठी बसले तरीही प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होताना दिसल्या नाहीत, म्हणून तालुक्यातील प्रमुख मंडळीना सोबत घेऊन लोकवर्गणीतून सदरच्या रस्त्यावरील खड्डा बुजवण्याचे काम हिवरवाडीकरांनी घेतले व आजचे उपोषण स्थगित केले. यावेळी प्रशासनाने डांबरीकरण करण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले आहे. तर लगेचच रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरु केले आहे.

करमाळा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झाल्याचे प्रमाण आहे.परंतु करमाळा शहर व परिसरात जर असे खड्डे असतील तर इतर खड्ड्यांचा विचार न केलेला बरा अशी परिस्थिती सध्या करमाळा तालुक्यात निर्माण झाली आहे. हिवरवाडी करमाळा केवळ तीन किमींचा रस्ता बऱ्याच दिवसांपासून खराब अवस्थेत असून त्यासाठी विनवण्या व इशारे देण्यात आले. परंतु त्याकडे कोण लक्ष देत नव्हते. अखेर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत ५ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यासाठी आल्यानंतर निषेध आंदोलन केले.

तसेच १२ ऑक्टोबर रोजी सर्वच विद्यार्थी दप्तरासह तहसील परिसरात येऊन उपोषणासाठी बसले होते. दरम्यानच्या काळात प्रशासनाला सात दिवसाचा कार्यकाल हा खड्डे बुजवण्यासाठी दिलेला असताना प्रशासनाने त्या ठिकाणी एक रेघही ओढली नाही. त्यामुळे विद्यार्थी अधिकच आक्रमक होते. यावेळी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे, दशरथ कांबळे, प्राध्यापक रामदास झोळ, माजी सभापती अतुल पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, सुनिल भोसले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत लोकवर्गणीतून खड्डे बुजवण्याचा तोडगा काढला व मार्ग करण्याचे निश्चित झाले. पण अजुनही संपुर्ण डांबरीकरण कधी ? हा प्रश्न तसाच राहिला आहे. यावेळी सरपंच अनिता पवार , बाळासाहेब पवार, प्रियंका इवरे, बापु पवार, सुप्रिया पवार यांच्यासह युवक विद्यार्थी व वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरीही पाझर फुटला नाही…
वरिष्ठांकडून रस्ता डागडुजी करण्यासाठी दोन लाख रुपयाचा निधी देण्याचे आश्वासन आलेलं असतानाही बांधकाम विभागाचे उपाभियंता बाळासाहेब गायकवाड हे जबाबदारी घेऊन लेखी आश्वासन देण्यासाठी तयार नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी उपोषणाला उठण्यापासून नकार दिला व जोपर्यंत रस्त्याला जाऊन खड्डे बुजवण्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत न उडण्याची आश्वासन दिले. तरीही प्रशासनाकडून कसलीही दखल घेण्यात आली नाही. लहान लेकर शाळा शिकण्यासाठी रस्त्याची मागणी करीत उपाशीतापाशी बसलेले असताना प्रशासन व सरकारला काय पाझर फुटला नाही. अखेर सामाजिक कार्यकर्ते व प्रमुख पुढार्यांनी पुढाकार घेत वर्गणीच्या माध्यमातून रस्ता करण्याचे ठरवल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
भिकमागो आंदोलन करुन जमवले पैसे ..
प्रशासनाकडे खड्डे बुजवण्यासाठी व रस्ता करण्यासाठी पैसे नसल्यामुळे विद्यार्थ्यांनीच पैसे गोळा केले व भीक मागून गोळा केलेल्या पैशातून दुसऱ्या कोणत्यातरी गावाचा रस्ता बुजवा असा उपहासात्मक आंदोलन याच वेळी त्या ठिकाणी करण्यात आले. गोळा झालेले पैसे उपअभियंता यांच्याकडे देण्याची नियोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः जवळील व उपस्थित नागरिकांकडून पैसे गोळा केले होते.