ऊस वाहतुकदारांच्या फसवणुकी विरूध्द जिल्ह्यातील साखर कारखानदार संघटीतपणे लढणार
करमाळा समाचार -संजय साखरे
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या पुढाकाराने ऊस तोडणी वाहतूकदार यांची मुकादम व मजूर टोळ्या यांचेकडून होत असलेल्या फसवणुकीच्या अनुषंगाने मंगळवार दि.06/12/2022 रोजी सकाळी 11 वा. विठ्ठलराव शिंदे कारखाना कार्यस्थळावर सोलापूर जिल्ह्यातील सहकारी/खाजगी साखर कारखान्यांचे मा.चेअरमन,मा.कार्यकारी संचालक व मा.शेती अधिकारी व मा.पांडूरंग शेळके-सहसंचालक(साखर),पुणे व करमाळ्याचे पोलिस उपअधिक्षक विशाल हिरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

सदर बैठकीमध्ये विचारविनिमय होवून खालील मुद्दे प्रकर्षाने मांडून त्याबाबत ठोस पावले उचलणेबाबत निर्णय घेण्यात आला.
1)आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तोडणी वाहतूकदार यांची मुकादम/मजूर टोळ्या यांचेकडून होणारी फसवणुक टाळणेच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील सहकारी व खाजगी कारखान्यांचे नऊ सदस्यांची कमिटी स्थापन करण्यात आली.

2)शासन निर्णयानुसार मुकादम व मजूरांची गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाकडे रितसर नोंदणी करावी.
3)कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राज्यातील सर्व साखर कारखान्यांसाठी तोडणी वाहतुकदार व मुकादम यांचेसाठी कराराचा एकच मसुदा निश्चित करावा.
4)साखर आयुक्त कार्यालयाने कराराचा नुमना निश्चित करणेसाठी सहभाग घेवून सर्वच कारखान्यांना विहीत नमुन्यामध्ये करार करणेची सक्ती करावी.
5)शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय समितीने मुकादम व मजूर यांची झालेल्या नोंदणीनुसार खातरजमा करून त्यांना त्याप्रमाणे ओळखपत्र द्यावे.
6)गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाकडे मुकादम व मजूर यांचे प्रमाणेच वाहतूक ठेकेदारांची नोंदणी करावी.
7)मुकादम यांचेकडून फसवणुक झाल्यास वाहतूक ठेकेदारांना गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळा कडून मदत देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय व्हावा.
8)फसवणुक झालेल्या ठेकेदारांचे स्थानिक पोलिस स्टेशनला गुन्हे नोंद करून घ्यावेत. इसेनन्शियल कमोडेटीज् ॲक्ट अंतर्गत मुकादमाविरोधात अजामीनपात्र फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
9)वाहतूक ठेकेदार यांनी साखर आयुक्तालयाकडील वाहतूकदार व्यवस्थापन या शिर्षकाखाली आपले मुकादम व मजूराची माहीती भरावी. तसेच फसवणुक केलेल्या मुकादमाची माहीतीही सदर ॲपवर भरावी.
10)कारखान्यांनी केलेल्या कराराच्या याद्या इतर कारखान्यांना देवून याद्या तपासून घ्याव्यात. जेणेकरून फसवणुक टाळता येईल.
11)वाहनमालक व मुकादम यांचे करार करताना ऑनलाईन पध्दतीचा अवलंब करावा. त्यामध्ये हाताचे बोटाचे ठसे,लाईव्ह फोटो इत्यादीसह मुळ कागदपत्रे तपासून करारासोबत घ्यावेत.
12)कोणत्याही परिस्थितीत मुकादम/मजूरांना रोख रक्कम देवू नये. तसेच ॲडव्हान्स रक्कम देताना बँकेच्या माध्यमातून व्यवहार करावा.