करमाळाकृषीसहकारसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पाण्याअभावी उस जाळला ; शेजाऱ्याच्या फडात आग लागल्याने डबल भुर्दंड

करमाळा समाचार – विशाल घोलप

कुकडी लाभक्षेत्रात असलेल्या अंजनडोह या गावातील शेतकऱ्याला जबर नुकसाचा सामना करावा लागला आहे. पाणी नसल्यामुळे काढणीला आलेला उस जाळला व जाळत असताना मोठे वादळ आले व शेजारच्या शेतात आग पसरली यामुळे स्वतःच्या उसाचे नुकसान सहन करताना शेजाऱ्याचेही अडीच लाखाच्या नुकसानीची भरपाई करण्याची वेळ आली आहे.

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेला तात्काळ मंजुरी मिळावी या मागणीसाठी माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील ३५ ते ४० गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी रोज नवनवीन गावातील पाठिंब्यासाठी पत्र व बैठका सुरू आहेत. दरम्यान परिसरात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई भासत आहे. परिसरातील विहिरी व तलाव आटलेले दिसून आले आहेत. यामुळे हाता तोंडाला आलेला घास हिरावून जाण्याची भीती शेतकऱ्याला सतावत आहे. परिसरात लागवड करण्यात आलेला ऊस हा तोडून नेण्यापूर्वीच आता शेतकरी स्वतः त्याला जाळत आहेत.

असाच एक प्रकार शेतकऱ्याच्या अंगलट आला आहे. अंजनडोह येथील शहाजी माने यांनी आपल्या शेतात काढणीला आलेला ऊस कारखाना नेत नसल्याने त्याला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी याच्या आगीचा लोट हा शेजारीच शेतात गेल्यामुळे स्वतःच्या उसासह शेजाऱ्याच्याही शेताचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीला माने यांना सामोरे जावे लागले आहे. शेजारीच असलेले संदिपान लोखंडे यांच्या शेतातील ऊस, ड्रीप, पाईपलाईन व इतर साहित्य जळून खाक झाल्याने त्यांना जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. तर याची भरपाई शहाजी माने यांना करावी लागली आहे. तर माने यांनी याची भरपाई करताना तब्बल दीड लाख रुपयांच्या साहित्य लोखंडे यांना देण्याचे ठरले व उधारीवर सदर साहित्य घेऊन दिले आहे. यातूनही उसाची रक्कम मात्र लोखंडे यांना मिळणार नाही. आधीच अडचणीत सापडलेला शेतकरी व त्यात होत असलेले या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

माझ्याकडे सहा एकर शेती असून त्यावर माझ्या कुटुंबाची उपजीविका चालते. पण पाणी नसल्यामुळे शेतातील पिकाची वाढ खुंटली व कारखाना ऊस नेण्यासाठी लवकर येईना. यामुळे पाण्याअभावी पिके जळू लागली होती. त्यामुळे ऊस जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. पण दुसरीकडे लागलेल्या आगीमुळे स्वतःच्या पिकाचे नुकसान तर झालेच पण शेजाऱ्याचेही नुकसान भरून देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. जोपर्यंत आमच्या भागात रेटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लागत नाही. तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही केवळ २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या उजनीतून पाणी मिळावे हीच आमची अपेक्षा आहे. अन्यथा आम्ही कायमचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार आहोत.
शहाजी माने, शेतकरी अंजनडोह.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE