करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

ज्यांच्याकडुन अपेक्षा त्यांनीच कारखान्यावर डोळा ठेवला ! ; बागलांसाठी बीजेपी सेफ – शेतकऱ्याच्या अडचणी संपणार का ?

करमाळा – नानासाहेब घोलप

श्री आदिनाथ व मकाई कारखान्यावर ज्या बागल गटाची सत्ता होती ते कारखाने सध्या अडचणीत आहेत. विशेष म्हणजे कारखान्यांना पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी बागलांनीही वेगवेगळे पर्याय अवलंबले आहेत. त्यामध्ये मोठ्या नेत्यांच्या जवळीक वाढवणे असेल किंवा पक्ष बदलून मदत घेणे असेल पण आज तागायत त्यांना मदत मिळण्याऐवजी ज्याच्याकडे अपेक्षा केल्या त्यानेच त्या कारखान्यावर डोळा ठेवला अशी परिस्थिती दिसून आली होती. तर आता बागल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात त्यांना यश येते का तिथेही निराशाच हाती लागते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

तालुक्याच्या राजकारणात केंद्रबिंदू असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची वाताहात झाली आहे. स्थानिक व वरिष्ठ पातळीवरच राजकारण याला जबाबदार असल्याचे लक्षात येतं. तसेच बागलांचा चुकीचा कारभार हा आदिनाथ सारख्या कारखान्याला अडचणीत आणण्यासाठी कारणीभूत असू शकतो. पण केवळ कारभारामुळे एखादा अडचणीत आलेला कारखाना बाहेर निघणे तितकेसे अवघडही नव्हते. त्याला वरिष्ठ पातळीवर सहकार्य झाले असते तर कारखाना अडचणीतून बाहेरही निघला असता. पण बागल गटाला अडचणीत आणत कारखान्यावरच दावा करणारे बरेचसे तयार झाले. यातून बागल बदनाम तर कारखाना बंद अशी अवस्था निर्माण झाली.

बागलांना बदनाम करत असताना कारखान्यासह शेतकऱ्यांचे नुकसान होते हे बऱ्याचदा अनेकांच्या लक्षात आले नाही. केवळ बागलांच राजकारण संपवण्याचा हेतू असता तर इतर ठिकाणीही त्यांचा पराभव करण्यासाठी विरोधक सरसावले असते. पण केवळ आणि केवळ कारखानाच डोळ्यासमोर ठेवून विरोध वाढत गेला व सहकार्याचं चित्र निर्माण करून त्या कारखान्यावरच डोळा ठेवणारी प्रवृत्ती उदयास येऊ लागली. हे वेळीच ओळखल्याने बागलांनी अशा लोकांपासून फारकत घेतली.

राष्ट्रवादीतुन फारकत घेऊन शिवसेनेत प्रवेश केलेले बागल यांनी शिंदे व ठाकरे दोन गट झाल्यावर शिंदे गटाशी जवळीक वाढवली यावेळी त्यांना कारखान्यात सहकार्य होईल असे वाटले होते पण कारखाने सुरळीत होण्याऐवजी एक कारखाना बंद पडला व तर दुसऱ्यावर प्रशासक आले. पहिल्या व दुसऱ्या पक्षातील कोणत्या नेत्यांचा डोळा यावर होता याबाबत दबक्या आवाजात चर्चा होतात पण उघडपणे कोण बोलत नाही. ज्यानेत्यांनी कारखाना अडचणीतुन बाहेर काढण्याचे शब्द दिले होते त्यांनी कारखाने का बाहेर काढले नाही. का अडचणीत आणुन कारखाना गिळण्याचा बेत होता ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे आता बागल यांनी सत्तेत असणाऱ्या इतर पक्षापेक्षा भाजपाची निवड केलेली दिसुन येत आहे. यापुर्वी भाजपाच्या नेत्यांनी कारखान्यासाठी मदत करताना कोणत्याही अटी किंवा शर्ती ठेवल्या नव्हत्या किंवा कारखाना ताब्यात घेण्याचा विचार किंवा चर्चा कोणत्याच भाजपा नेत्याबाबत झालेली नाही. म्हणून बागल यांना भाजपा मध्ये जाताना भितीमुक्त वाटले असावे अशी चर्चा जवळच्या कार्यकर्त्यामध्ये सुरु आहे. पण आता भाजपा प्रवेशानंतर तरी बागल यांच्या ताब्यातील कारखाने सुस्थीत येतील का ? शेतकरी व कामगारांची देणी मिळावेत अशी अपेक्षा सगळ्यांची आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE