करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

बंद गाड्यांची मालीका सुरुच ; विठ्ठल भक्तांची गरज नसताना घडली पायी दिंडी

करमाळा समाचार

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मागील बऱ्याच दिवसांपासून नव्या गाड्या आलेले नाहीत. शिवाय कोरोना काळात व कामगारांच्या संपामुळे गाड्या बंद अवस्थेत होत्या. यामुळे जवळच्यासह लांब पल्ल्याच्याही गाड्या मध्येच बंद पडत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे आता समाज माध्यमातून सदरची नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. केवळ करमाळा तालुक्याचा हा प्रश्न नसून परिसरातील गाड्या ची हीच अवस्था असल्याचे निदर्शनास येत आहे. आज अमरधाम जवळ बंद पडलेल्या गाडीमुळे विठ्ठल भक्तांना गरज नसताना करमाळा शहरापर्यत पायी वारी करण्याची वेळ आली.

करमाळा तालुक्यात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी बस बंद पडत असल्याच्या बातम्या व फोटो समाजमाध्यमातून फिरू लागले आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या गावाला एक ते दोन बस बंद पडताना दिसत आहेत. त्या ठिकाणी उभा असलेल्या प्रवाशांना घाईचे काम असतानाही दुसऱ्या बसची वाट बघून प्रवास करावा लागत आहे. तर प्रवाशाना सोडून माघारी गावी येणारी गाडीही मध्येच बंद पडल्याने सदरच्या चालक व वाहकांना मुक्काम करावा लागत आहेत. त्यांच्याकडे अपुऱ्या सुविधा व मुबलक सामान उपलब्ध नसतानाही अशा ठिकाणी राहणे त्यांच्या ही जीविताला धोका निर्माण करणारे आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत अंधार लवकर पडत आहे अशा परिस्थितीत रात्री अपरात्री गाडी बंद पडून मध्येच रस्त्यात काही अघटीत घटना घडल्यास याला जबाबदार कोण असेल असेही प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे ज्या गाड्या जास्त लांब जाऊ शकत नाही किंवा बाहेर पडल्यानंतर बंद पडणार आहे अशा गाड्यांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी टाळावे अशी मागणी केली जात आहे. त्याशिवाय नवीन गाड्या लवकरात लवकर उपलब्ध कराव्यात याही मागणीला जोर धरू लागला आहे.

बस साठी का लोकांसाठी योजना ?
बस स्थानकाची अवस्था बघून बस कडे प्रवासी फिरकत नव्हते. यावेळी बऱ्याचशा गाड्या बंद कराव्या लागत होत्या. प्रवासी नसल्यामुळे फेऱ्या रद्द केल्या जात होत्या. यानंतर सरकारकडून वृद्धांसाठी मोफत व महिलांसाठी अर्धे तिकीट केल्यामुळे पुन्हा एकदा एसटीला चांगले दिवस आले. पण प्रवासी संख्या एवढी वाढली की रोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या लोकांना व विद्यार्थ्यांनाही आता गाड्या मिळत नाहीत. गाड्यांच्या गाड्या भरून गेल्या तरी प्रवासी अजूनही खालीच ताटकळत उभा राहत आहेत. मुळातच गाड्या भरून जात असताना प्रमाणापेक्षा प्रवासी गाडीत भरल्याने धोका संभवतो तरी हा जीवघेणा प्रवास सुरूच आहे. सरकारने जुन्याच गाड्या आहे तसेच ठेवून मोफत योजना कार्यान्वित केली. यावरून लोकांसाठी सदर योजना नसून बंद पडत चाललेल्या महा परिवहन याच्यासाठी योजना असल्याचे दिसून येत आहे. लोकांना योजना द्यायच्या असतील तर प्रवासासाठी चांगल्या बस द्या अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया
गाडी सुखरुप माघारी आल्यास बातमी…
रोजच गाड्या बंद पडत असल्याने आता एखादी गाडी संपूर्ण प्रवास करून सुखरूप माघारी आल्यास ती बातमी होऊ शकेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे रोज सकाळी गाडी बंद पडल्यापासून बातमी ऐकायला मिळते तर रात्री अपरात्री ही गाड्या बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे
– अतुल चव्हाण, रोशेवाडी.

विद्यार्थ्यांच्या परिक्षेचे दिवस ..
करमाळा शहरातून शेजारील तालुक्यात विद्यार्थी शिक्षणासाठी जात आहेत. अशावेळी त्यांना शाळेला जाण्यासाठी उशीर तर होतोच शिवाय सध्या परीक्षेचे दिवस आहेत. एखाद्या विषयाची परीक्षा जाण्यास उशीर झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.
– महेश शहाणे, करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE