ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाला धोका ; डिकसळ कडील बाजूला काही दगड निखळले
संजय साखर – करमाळा समाचार
ब्रिटिश सरकारने बांधलेल्या डिकसळ पुलाला धोका निर्माण झाला असून डिकसळ कडील बाजूला दगड काही प्रमाणात निखळले आहेत. त्यामुळे त्या बाजूने जड वाहतूक करताना काळजी घ्यावी असे आवाहन त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे व डॉ. गोरख गुळवे यांनी केले आहे.

आज सकाळी त्यांनी त्या पुलाची तालुक्यातील पश्चिम भागातील काही नागरिकांसह समक्ष जाऊन पाहणी केली असता त्यांना ही गोष्ट निदर्शनास आली. ज्या बाजूला दगड निखळले आहेत. त्याच्यावरती पुलावर दगड टाकून तो रस्ता त्या बाजूला वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वरून येताना याबाजूने येऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर पूल ब्रिटीशकालीन असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट ही झाले आहे. भीमा नदी वरील हा पूल सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणारा असून याद्वारे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. याशिवाय साखर कारखाने चालू असताना या पुलावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणारी वाहने ये-जा करतात.
पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत कोर्टी ते टाकळी रस्ता अतिशय चांगल्या प्रतीचा झाला असल्यामुळे करमाळा तालुक्यातील पुण्याला जाणारी सर्व वाहने येथूनच पुण्याला जातात. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणावर रहदारी चालू असते. त्यामुळे या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.