करमाळासोलापूर जिल्हा

वर्धापनदिन विशेष- बागलांच्या नंतर राष्ट्रवादीची अवस्था ; वाढवायची व टीकवायची असेल तर …

करमाळा समाचार 

मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला उमेदवारही मिळाला नव्हता. त्यातही बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला आयत्यावेळी माघार घेण्यास भाग पाडले होते अशा परिस्थितीत राष्ट्रवादी संपतेय का काय अशी चिन्ह निर्माण झाले होते. बागल व राष्ट्रवादी समीकरण अतिशय तगडे झाले होते. पण ऐन वेळी बागल यांनी राष्ट्रवादी सोडल्याने राष्ट्रवादीमध्ये एकमत राहिले नसल्याचे दिसून येते. आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे गट तयार करून वेगवेगळी कामे करताना दिसून येत आहेत. सर्वांना एकत्र आणायचे असेल तर विद्यमान आमदारांनी राष्ट्रवादीसाठी काम करताना तालुक्यात पदाधिकाऱ्यांना एकत्र आणणे गरजेचे झाले आहे.

मुळातच बागल यांच्याकडे धुरा असताना त्यांनी गटातील समर्थकांना राष्ट्रवादीत काम करण्याची संधी दिली. बागल यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी बरेचजण त्यांच्यासोबत गेले. पण काही जण राष्ट्रवादीतच टिकून राहिले. त्यामधील श्रीकांत साखरे, अभिषेक आव्हाड, नितीन झिंजाडे, हनुमंत मांढरे, ॲड. सविता शिंदे, नलीनी जाधव यासारखे चेहरे राष्ट्रवादीतील युवकांना सोबत घेऊन काम करताना दिसत होते. परिस्थिती अतिशय नाजूक झाली होती. विद्यमान आमदार संजय मामा शिंदे तेही त्यावेळी राष्ट्रवादी पासून फारकत घेऊन होते. राष्ट्रवादी वाढण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नव्हती अशा परिस्थितीतही युवकांनी मोठ बांधण्याचा प्रयत्न केला वरिष्ठांची संपर्क साधून प्रयत्न करत राहिले. पण आता सर्व काही राष्ट्रवादीसाठी अलबेल असताना तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत असल्याचे दिसुन येत नाही.

सध्या तालुक्यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचे गाव पातळीवर काम सुरु आहे. आव्हाड यांनी शहराची धुरा संभाळली आहे. श्रीकांत साखरे यांच्याकडे राष्ट्रवादीने दुर्लक्ष केले आहे. त्यांना युवक तालुकाध्यक्ष पद अपेक्षीत असताना ते मिळुन न देण्यात त्यांचेच जुने सहकारी पळत होते. हनुमंत मांढरे कार्याध्यक्ष म्हणुन सक्रिय आहेत. जुन्यांसह सविता शिंदे मोठ्या जबाबदारी स्वीकारण्यास तयार असताना दुर्लक्षित आहेत. नितीन झिंजाडे त्यांच्या टीम सोबत वेगवेगळ्या प्रश्नावर बाजु मांडताना दिसतात पण आता राष्ट्रवादीच्या चांगल्यासाठी यासर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे झाले आहे. शिवराज जगताप , आझाद शेख असे अनेक कार्यकर्ते कामात असल्याचे दिसते. सध्या मोठे नेते तर बाजुलाच पण दुसऱ्या तीसऱ्या फळीतील नेत्यांना नेतृत्व नसल्याने सैरभैर झाल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने बागलांकडे राष्ट्रवादी असताना एकजीव होती तशीच आता जबाबदारी संजयमामांनी घ्यायला पाहिजे तरच राष्ट्रवादी टिकेल व वाढेल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE