होम वोटिंग मध्ये तीघांचा नकार तर तीन मयत ; १३५ मतदारांनी बजावला हक्क
करमाळा समाचार – विशाल घोलप
तालुक्यात होम वोटिंग पर्याय निवडलेल्या १४२ पैकी १३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकुण मधील तीन व्यक्ती मयत तर तिघांनी मतदान करण्यास नकार दिल्यामुळे त्यांचे मतदान होऊ शकले नाही. सदरचे नकार देणारे तीघे रिटेवाडी उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी यासाठी आग्रही होते त्यांनी बहिष्कार टाकल्याचे सांगितले. तर एक दिव्यांग बाहेरगावी असल्याने सात मतदारांचे मतदान होऊ शकले नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चारुशीला देशमुख, तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी दिली.

करमाळा तालुक्यामध्ये एकूण १५ पथके तयार करण्यात आली होती. त्यामध्ये प्रत्येकी सात कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दरम्यानच्या काळात तालुक्यात १२ ते १७ एप्रिल मध्ये होम वोटिंग इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये १४२ लोकांना होम वोटिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामध्ये ८५ वर्षा पेक्षा जास्त वय असलेले १२२ लोक तर दिव्यांगांमध्ये वीस लोकांचा समावेश होता.

८५ वर्षाच्या वरील १२२ मतदारांपैकी तीन लोक मतदानापूर्वीच मयत झाले. शिवाय तिघांनी रेटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी मतदानावर बहिष्कार घातला. यामुळे अशा सहा वृद्धांचे मतदान वगळता इतर ११६ जणांचे मतदानाचा हक्क बजावण्यात आला आहे. तर वीस दिव्यांगा पैकी एक दिव्यांग बाहेरगावी असल्याने त्यांना मतदान करता आले नाही. प्रशासनाने पथकांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी जाऊन पुर्ण प्रयत्न करून सर्व मतदान करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.