वाहतुकीचे नियम पाळूनच प्रवास करा; मोटर वाहन निरीक्षक युवराज पाटील यांचे आवाहन
वाहतुकीचे नियम पाळूनच प्रवास करा; मोटर वाहन निरीक्षक युवराज पाटील यांचे आवाहन ;करमाळ्यात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन
करमाळा, दि. २५- प्रवास करत असताना दुचाकीस्वारांनी हेल्मेट तसेच इतर मोठ्या वाहनातील प्रवाशांनी सीटबेल्टस् योग्य प्रकारे वापरावेत. तसेच वाहतुकीचे नियम पाळूनच प्रवास करावा. कारण त्यामुळे प्रवास अपघातमुक्त होवून जीवन सुरक्षित राहिल. असे प्रतिपादन मोटर वाहन निरीक्षक युवराज पाटील यांनी केले आहे.

करमाळा येथे सोमवारी, दि. 25 जानेवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज अंतर्गत मासिक शिबिर पार पडले. यावेळी रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने वाहनचालक, वाहन वितरक, मालक, मोटार स्कूल चालक तसेच उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना पाटील हे बोलत होते.

सडक सुरक्षा, जीवन रक्षा हे घोषवाक्य घेवून राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून अठरा जानेवारी ते सतरा फेब्रुवारी दरम्यान ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ते वाहतुकीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच करमाळा मासिक शिबिर दौऱ्यावेळी प्रबोधनात्मक हा मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
यावेळी शिवरत्न व कमलाई बजाज शोरुम या रुपनवर यांच्या वाहन विक्री केंद्राच्या वतीने काही दुचाकी चालकांना हेल्मेट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलताना पाटील यांनी, वाहन चालकांनी मद्यपान करुन वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, वाहतुकीची शिस्त पाळावी. असे सांगत वाहन चालविताना घ्यायच्या काळजीविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थितांना रस्ते सुरक्षिततेची शपथ देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.