तालुक्याच्या टोकाच्या दोन गावात पाणी टंचाईच्या झळा ; टॅकरसाठी प्रस्ताव दाखल
करमाळा समाचार
तालुक्यात पुन्हा एकदा पाणी टंचाई दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींवर तळ गाठला असून तालुक्यातील वरकुटे व केम येथे टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले आहेत. या दोन्ही गावात संबंधित ठिकाणी जाऊन गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी पाहणी केली.


तालुक्यात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदा पाणीटंचाई उशिरा का होईना भासू लागली आहे. मागील वेळी आजच्या दिवशी तब्बल २९ टँकर प्रस्ताव आले होते. तर पाणी सुरू करण्याची लगबग सुरू झाली होती. परंतु यंदाच्या वेळी आतापर्यंत केवळ केम व वरकुटे या ठिकाणाहून पाण्याचे प्रस्ताव आले आहेत. मागील वर्षी तब्बल ४५ पेक्षा जास्त ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तर यावर्षी उन्हाळा संपेपर्यंत ४५ गावांना पाण्याची टँकरची गरज भासू शकते. त्यामुळे प्रशासन कामाला लागले आहे.
मागील महिन्यात पाणीटंचाई आढावा बैठक आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार जलजीवनच्या योजना अद्यापही बऱ्याच ठिकाणी पूर्ण नसून पाणी टँकर सुरू केल्याशिवाय पर्याय राहिलेले नाहीत. गटविकास अधिकारी अमित कदम यांनी पाहणी केल्यानंतर विहिरींनी तळ गाठलेला दिसून आला. तर येणाऱ्या काळात ४५ गावांमध्ये सदरचा पाणीपुरवठा करणे गरजेचे पडू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तरी दोन गावांचा पाणी प्रश्न निर्माण झाला असून केम व वरकुटे येथील प्रस्ताव पुढे पाठवण्यात आले आहेत.