नियोजनशुन्य विज्ञान शिक्षक पदोन्नती ; रिक्त – अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर
समाचार टीम –
जिल्हा परिषद माध्यमांच्या प्राथमिक शाळेतील विज्ञान शिक्षक चाळीसांची पदोन्नती प्रक्रिया पार पडलेली आहे. त्यावेळीच समाजशास्त्र विषय शिक्षक समायोजन प्रक्रियाही पार पडणे आवश्यक असताना ती प्रक्रिया मात्र रखडली आहे. परिणामी विज्ञान शिक्षक पदोन्नती प्रक्रियेमध्ये एका शाळेवरुन दुसऱ्या शाळेवर शिक्षक गेले असताना मुळ शाळेवर शिक्षकांची कमतरता भासत आहे. तर जवळपास तीस शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. या अडचणी वाढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले आहे.

वास्तविक पाहता विज्ञान शिक्षक पदोन्नती प्रक्रिया व समाजशास्त्र विषय शिक्षक समायोजन प्रक्रिया या एकाच वेळी पार पडणे आवश्यक होते. परंतू विज्ञान शिक्षक प्रक्रिया पार पडून वीस दिवस उलटले. तरी समाजशास्त्र विषय शिक्षक संबंधित प्रक्रिया जैसे थे आहे. याचा फटका द्विशिक्षकी, तीन शिक्षकी अशा काही कमी शिक्षक असलेल्या शाळांना बसलेला आहे.

विज्ञान शिक्षक पदोन्नती प्रक्रियेत संबंधित शिक्षक दुसऱ्या शाळेत रुजू झाले, तर समाजशास्त्र शिक्षक प्रक्रिया पार न पडल्यामुळे त्यांच्या मुळ शाळेत आवश्यक शिक्षक न येता शिक्षकाची कमतरता भासत आहे. काही द्विशिक्षकी शाळेतील एक शिक्षक विज्ञान शिक्षक म्हणून इतर दुसऱ्या शाळेत गेल्यामुळे उर्वरित एका शिक्षकावरच ताण येत आहे. एक शाळा एकच शिक्षक असे चित्र होवून संबंधित शिक्षकाला सर्व वर्ग अध्यापनासह मुख्याध्यापक जबाबदारी सांभाळून इतर कामे करावी लागत आहेत.
दरम्यान समाजशास्त्र शिक्षक समायोजन प्रक्रिया रखडल्याने ज्या शाळेवरील शिक्षक विज्ञान शिक्षक म्हणून दुसरीकडे रुजू झाले आहेत. तशा शाळेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले आहे. तर ज्या शाळेवर विज्ञान शिक्षक म्हणून शिक्षक रुजू झाले आहेत. तेथे शिक्षक संख्या वाढल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर समाजशास्त्र शिक्षक समायोजन प्रक्रिया तात्काळ पार पाडली जाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
काही तांत्रीक कारणामुळे समायोजन रखडले आहे. यासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बोलणे चालु आहेत. लवकरच समायोजन करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. इतर काही अफवा आहेत त्याकडे दुर्लक्ष करावे. लवकरच मार्ग निघेल.
किरण लोहार ,
शिक्षणाधिकारी सोलापुर (प्राथमीक)
करमाळा तालुक्यात एकुण शाळासंख्या २२७ शाळा आहे. या ठिकाणी ६४६ उपशिक्षक मजूर आहेत. पण केवळ ५८६ कार्यरत आहेत. उपशिक्षकांच्या ६० जागा रिक्त आहेत. तर ४० मुख्यध्यापक पदे मंजुर आहेत पण कार्यरत केवळ ३३ आहे तेही ७ रिक्त आहेत. विज्ञान प्रमोशन नंतर विज्ञान मंजुर ६१ कार्यरत ४३, भाषा मंजुर ५९ कार्यरत ४५ व समाजशास्त्र मंजुर १२ कार्यरत ४२ असे एकुण पदाचे गणीत असुन समाजशास्त्र समायोजन न झाल्याने ३० पदे अतिरिक्त झाले आहेत. पण ज्या ठिकाणाहुन पदोन्नती मिळाली तिथे शिक्षक कमी आहेत. अशा चाळीस ठिकाणी शिक्षक नाहीत.