रस्ते विकास आराखड्यासाठी ग्रामपंचायतींनी रस्त्यांची नावे द्या
करमाळा समाचार
रस्ते विकास आराखडा 2021 ते 2041 राबविला जात असून त्यासाठी प्रत्येक गावातील,वाडी – वस्तीवरील रस्ते प्लॅन मध्ये घेण्यासाठी रस्त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून करमाळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत व नागरीकांनी आपल्या गावातील,वाड्या- वस्तीवरील रस्ते विकास आराखडा साठी नावे द्यावीत असे आवाहन भाजप महीला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष्या रश्मी बागल यांनी केले आहे.

वाडी वस्तीवरील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी रस्ते प्लॅनमध्ये असणे आवश्यक असते.परंतू रस्ते प्लँन मध्ये नसल्यामुळे अनेक वेळा अशा रस्त्यांचे मजबुतीकरण करता येत नाही. त्यामुळे असे रस्ते प्लॅनमध्ये घेण्यासाठी 20 वर्षाचा विकास आराखडा तयार केला जातो. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सदर रस्त्यांचे सर्वे करून सदर रस्त्यांचा समावेश ग्रामीण मार्गामध्ये केला जात असतो.
महाराष्ट्र शासनाचा 2001 ते 2021 हा रस्ते विकास आराखडा यापूर्वी तयार करण्यात आलेला होता. पुढील 20 वर्षाचा रस्ते विकास तयार केला जाणार असून त्यासाठी ग्रामपंचायत संमती असणे आवश्यक आहे.सदर रस्त्यांची यादी तयार झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून सदर रस्त्यांना ग्रामीण मार्ग मिळवण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठविला जाईल त्यानंतर त्या रस्त्यांचा समावेश ग्रामीण मार्गामध्ये केला जाईल.
