शाळा सोडुन आम्ही काय भांडी घासायचे का ? शिक्षक नसल्याने विद्यार्थीनींचा सवाल
करमाळा समाचार
शाळेला शिक्षक नसल्यामुळे वांगी क्रमांक एक येथील विद्यार्थ्यांनी करमाळा येथे गटशिक्षणाधिकारी यांनाच गाठले आहे. गटशिक्षणाधिकाऱी यांना पंचायत समिती परिसरात त्यांनी घेराव घातला आहे. यावेळी आम्हाला शिक्षक द्या अन्यथा आम्ही इथून हलणार नाही, शाळा सोडून आम्ही घरी काय भांडी घासायची का ? असे अनेक प्रश्न हे विद्यार्थी विचारू लागले आहेत. तर यावर आता अधिकारी लवकरच शिक्षक देऊ म्हणून सांगत आहेत .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र शाळा वांगी क्रमांक एक येथे सध्या कार्यरत शिक्षक संख्या सात आहे. परंतु शाळेच्या पटाचा विचार करता आणखी तीन शिक्षकांच्या आवश्यकता आहे. शाळेचा सध्याचा पट पहिली ते पाचवी 154 व सहावी ते सातवी 120 असा आहे. इतर पाच ते सातच्या सेमी व मराठी माध्यमाच्या दोन वेगवेगळ्या तुकड्या आहेत.

अध्यापन कार्य सध्या एकाच वर्गात चालू आहे. एकाच वर्गातील अध्यापन कार्यामुळे विद्यार्थी अध्यापनावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. तसेच एवढे विद्यार्थी बसतील अशा क्षमतेचे वर्गही नाहीत. त्यामुळे आणखी तीन शिक्षक मिळावेत या मागणीसाठी स्वतः विद्यार्थी करमाळ्यात गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर येऊन बसले आहे.
यावेळी त्यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, विष्णुपंत वाघमारे, उपाध्यक्ष राजेंद्र महाडिक, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर ढावरे, माजी उपाध्यक्ष गणेश रकटे, दगडु लिगडे, लक्ष्मण ढावरे आदि उपस्थित होते.