अखेर अजितदादांचे घड्याळ मामांच्या हाती ; जिल्हा परिषद तीन तर पंचायत समिती सहा उमेदवारी
करमाळा समाचार – विशाल घोलप

करमाळा पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाच्या एबी फॉर्मच्या गोंधळावर अखेर पडदा पडला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून नऊ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यामध्ये तीन जिल्हा परिषद तर सहा पंचायत समितीचे उमेदवार आहेत. सदर एबी फॉर्म मिळवत शिंदे गटाने आपली ताकद राष्ट्रवादीत असल्याचे दाखवून दिले आहे.

जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले आहे. परंतु करमाळ्यात सदरची गणिते जुळली नाहीत व मोहिते पाटील यांच्याकडे तुतारी तर माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे घड्याळ चिन्ह आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत याबाबत अनेकांना संभ्रम होता तर कार्यकर्तेही उघड बोलणे टाळत होते. पण सदर घडामोडीनंतर संजय मामा शिंदे यांचं अजित पवार यांच्या जवळ असलेलं वजन या ठिकाणी कामी आलं व त्यांनी आपल्या उमेदवारांसाठी सदरची एबी फॉर्म घेऊन आपली ताकद दाखवून दिली आहे.
सदरची चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यामुळे आता भाजपा व राष्ट्रवादीचे घड्याळ एकत्र लढणार असल्याचे दिसून येत आहे. तर विरोधी गटात अपेक्षित अशी एकी न झाल्यामुळे त्याचा फायदा भाजपा व कमळ घेऊन उभा असलेल्या उमेदवारांना होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या वेळी अंतिम चित्र स्पष्ट होताना दिसेल. त्यावेळी नेमकं कोण कोणाविरोधात लढते हे स्पष्ट होणार आहे. पण सध्यातरी चिन्हासाठी शिंदेंनाही संघर्ष करावा लागला पण अखेर विजय शिंदेंचाच झाल्याचे दिसत आहे.


