सामायिक जागेच्या वादातून महिलेवर हल्ला ; पुतण्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल
करमाळा | प्रतिनिधी

वरकटणे (ता. करमाळा) येथील गट नंबर 165/4/ब मधील सामायिक जागेच्या वादातून एका महिलेवर शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना 15 जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद श्रीमती शोभा बाळासाहेब माने (वय 58, रा. वरकटणे) यांनी दिली आहे. फिर्यादीनुसार, संबंधित गटामध्ये सामायिक घर असून त्या ठिकाणी फिर्यादी एकट्याच वास्तव्यास आहेत. संक्रांत सणानिमित्त फिर्यादींची सून व नातवंडे घरी आलेली असताना संशयित पृथ्वीराज उर्फ सोन्या राजेंद्र माने याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने घरालगतच्या सामायिक जागेत काम सुरू केले.
सदर जागेची चतुरसीमा निश्चित नसल्याने काम थांबवण्याची विनंती केल्यावर संशयिताने फिर्यादीस शिवीगाळ करत ठिबक पाईपच्या तुकड्याने हात, डोके व पाठीवर मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच घरासमोर वाहने उभी केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देत “तुझ्या कुटुंबावर खोट्या केसेस दाखल करून अडकवीन”, अशी भीती निर्माण करणारी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतर फिर्यादींच्या सुनेने हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादीने आपल्या मुलास बोलावून करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फिर्यादीस शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीस पाठवले असून उपचारानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118 (1), 351 (2) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

