करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

१० किलो गांजा जप्त; पण मुख्य सूत्रधार कोण? पुरवठादार आणि खरेदीदारांचा शोध अद्याप बाकी?

करमाळा

दि. ८ जून : करमाळा पोलिसांनी साडेतीन लाखांच्या मुद्देमालासह १० किलो २४८ ग्रॅम गांजा जप्त करून एका आरोपीला अटक केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मात्र या कारवाईनंतर अनेक महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित राहिले असून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख उर्फ फंट्या दिलीप दोषी याच्याकडून सुमारे २ लाख ५६ हजार २०० रुपये किमतीचा गांजा व ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ३ लाख ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त झाल्यानंतरही हा गांजा नेमका कोणाकडून आणला गेला, त्याचा पुरवठादार कोण आहे, तो कोठून आला, कोठे साठवला गेला आणि तो कोणाला विकला जाणार होता, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कायद्याच्या दृष्टीने अशा प्रकरणात फक्त वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करून तपास पूर्ण होत नाही. या मागे असलेले पुरवठादार, आर्थिक लाभार्थी, स्थानिक संपर्क आणि खरेदीदार यांचाही शोध घेणे तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे या प्रकरणात पोलिस फक्त एक आरोपी पकडून थांबणार की संपूर्ण अमली पदार्थ साखळीचा पर्दाफाश करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE