करमाळासोलापूर जिल्हा

गावगाड्यातही ज्यांना कवडीमोलाची किंमत नाही अशा गटबदलू कार्यकर्त्यांनी जिल्हयाच्या राजकारणावर बोलू नये ; राजकारण तापले

जेऊर :

गावगाड्यातही ज्यांना कवडीमोलाची किंमत नाही अशा गटबदलू कार्यकर्त्यांनी जिल्हयाच्या राजकारणावर बोलू नये, असा हनूमान टोला चिखलठाणचे माजी सरपंच हनूमंत सरडे यांनी लगावला. माजी आमदार नारायण पाटील यांना जेऊर येथील पत्रकार परिषदेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कामावर आपण समाधानी आहात का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पाटील यांनी हो समाधानी आहोत असे उत्तर दिले.

यावर आमदार शिंदे गटाकडून राजेंद्र बारकुंड यांनी थेट माजी आमदार नारायण पाटील व पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्यावर टीकास्त्र सोडले. उजनीच्या पाच टिएमसी पाण्याच्या विझलेल्या आगीला फुंकर देऊन नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण आज पाटील गटाचे समर्थक हनूमंत सरडे यांनी मात्र बारकुंड यांच्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी आपल्या खास गावरान शैलीत बोलताना सरडे यांनी सांगितले की गावगाड्यात ज्यांना कधीच त्यांचे मत विचारले जात नाहीत असे पुढारी आता उखळ पांढरं करायचा प्रयत्न करत आहेत. चालू आमदारांवर आपली किती निष्ठा आहे हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रकार आहे. कोरोनाची महामारी थैमान घालत असताना पालकमंत्री भरणे मामा यांनी दोन वेळा करमाळा दौरा केला. यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांना बरोबर घेऊन आढावा बैठक घेतली.

पण विद्यमान आमदार मात्र पुण्यात काचेच्या बंगल्यात स्वतः ला जपत होते.आमदारांच्या ह्रदयात नक्की कोण राहतं हे ठाऊक त्यांनाच ठाऊक पण माजी आमदार नारायण पाटील यांच्या ह्रदयात मात्र सर्वसामान्य जनता आणि उजनीकाठचे हजारो धरणग्रस्त आहेत हे मात्र खरे आहे. त्यामुळेच उजनीकाठचा ऊस, केळी उत्पादक शेतकरी वीजकपातीच्या संकटात असल्यावर त्यांचा प्रश्न सोडवण्याचे काम पाटील यांनीच केले. तर अनेक वर्ष रखडलेला व दुर्लक्षीत राहिलेला पुनर्वसीत गावांच्या नागरी सुविधा कामांनाही पाटील यांनीच निधी मिळवून दिला.पाटील यांनी त्यांच्या आमदारकीच्या कालावधीत 28 कोटी रुपयांचा निधी पुनर्वसन कामासाठी तालुक्यास मिळवून दिला.

आज जे विरोधक पालकमंत्री व माजी आमदार यांच्यावर शाब्दीक आरोप करुन प्रश्न विचारत आहेत त्यांनी चिखलठाण गावाच्या विकासासाठी कोणते योगदान दिले हे जरा जाहिर करावे. उजनीचं पाच टिएमसी पाणी इंदापुरला जाऊ द्यायचं नाही यावर सोलापुर जिल्हा एकत्र आला होता. माजी आमदार पाटील यांनी आंदोलन व मराठवाड्यास जाणार्‍या बोगद्याचे काम थांबवण्याचा इशारा दिला होता. सामुदायिक विरोधामुळे रद्द झाला. पण याचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी काहींनी मुंबईत तळ ठोकला होता. पण जनतेला सर्व ठाऊक आहे. आता उगीच मिटलेले वाद परत उकरुन भीमा नदीच्या दोन तीरावर वसलेल्या इंदापुर व करमाळा तालुक्यातील चांगले संबंध बिघडवण्याचा प्रयत्न सत्ताधारी मंडळी करत आहेत.

आपला नेता पालकमंत्री व्हावा असे दिवास्वप्न शिंदे गटातील कार्यकर्ते पहात होते. पण पालकमंत्री होण्याच्या अगोदर मंत्रीपद असावे लागते याचा त्यांना विसर पडला असावा. सध्यातरी राज्याच्या मंत्रीमंडळात शेतकऱ्याची फसवणुक करण्याचे स्वतंत्र खाते नसल्याने आ. संजय शिंदे यांना शेतकऱ्यांना फसवण्याचा दांडगा अनुभव असूनही या पदापासून वंचित रहावे लागणार आहे असा टोलाही सरडे यांनी लगावला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE