करमाळासोलापूर जिल्हा

उजनीच्या पाणी साठ्यात झपाट्याने घट, लवकरच मायनस मध्ये जाण्याची शक्यता

करमाळा समाचार -संजय साखरे


सोलापूर सह पुणे आणि नगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होत असून पावसाळ्यात 123 टीएमसी एवढा प्रचंड पाणीसाठा असलेले धरण लवकरच मायनस मध्ये जाण्याची शक्यता आहे. याचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला असून आपले विद्युत पंप खाली सरकवताना त्यांना कसरत करावी लागत आहे. यामुळे त्यांच्यावर पाईप व केबलचा आर्थिक भुर्दंड पडत असून भविष्यात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत उन्हाळ्यात शेतीसाठी दोन आवर्तने सोडण्यात येत होती, परंतु चालू वर्षात तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला आहे. मे महिन्यात जर सोलापूरसाठी नदीत पाणी सोडले तर धरण मायनस मध्ये जाणार आहे. याचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे.

सोलापूर शहराला पिण्याच्या नावाखाली सोडलेले पाणी कर्नाटकातील शेतकरी अनाधिकृतपणे शेतीसाठी उपसा करीत आहेत. यामुळे ओज बंधाऱ्यातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. या संदर्भात प्रशासनाने कारवाई करण्याची गरज असल्याचे धरणग्रस्त शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.

सध्या उजनी धरणातून सीना माढा उपसा सिंचन योजनेद्वारे ३३३, दहिगाव उपसा सिंचन योजनेद्वारे 120, बोगद्याद्वारे 810 तर कालव्याद्वारे तीन हजार क्यूसेक एवढे पाणी प्रतिदिन सोडले जात आहे.

यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आयएमडी आणि स्कायमेट या संस्थांनी वर्तवलेला आहे .सरकारने याचा गांभीर्याने विचार करून आतापासूनच पीक नियोजन आणि धरणातील पाणीसाठ्याचे पिण्यासाठी व शेतीसाठी काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे. शिवाय दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या कामाचा आराखडा ही तयार करणे गरजेचे आहे. सरकार आणि विरोधी पक्षाने राजकारण आणि परस्परांतील मतभेद विसरून यावर हातात हात घालून काम करावं जेणेकरून भविष्यातल्या संभाव्य संकटाची तीव्रता कमी होईल.

-तेजस ढेरे,सामाजिक कार्यकर्ते

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE