गरिबांना स्वर्गाचे आमिष तर श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लूट – डॉ श्रीमंत कोकाटे
करमाळा समाचार – संजय साखरे
गरीब लोकांना स्वर्गाचे आमिष् तर श्रीमंत लोकांना नरकाची भीती दाखवून समाजाला लुटण्याचे काम आजही चालू आहे यातून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडा व विज्ञानवादी व्हा असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी केले.
काल रिटेवाडी तालुका करमाळा येथे जागतिक महिला दिन, राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती व महाशिवरात्रीचे अवचित्य साधून लोक देव भैरवनाथाच्या मूर्तीची स्थापना व मंदिराचा कलशारोहण समारंभ संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर श्रीमंत कोकाटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोर विचारवंत व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी .जी कोळसे पाटील होते.
यावेळी बोलताना कोकाटे पुढे म्हणाले की, भैरव, ज्योतिबा, महादेव, म्हसोबा, भवानी, पांडुरंग ही बहुजनांची दैवत आहेत. या लोकदेवाची पूजा करणे ही आपली परंपरा असून भैरव अन्याय विरुद्ध लढून अन्याय करणाऱ्यांना जरब बसवणारा देव आहे. भैरव हे शंकराचे उग्ररूप आहे .शंभू महादेव ज्ञात इतिहासातील महापुरुष असून शंकर स्त्री पुरुष समानतावादी होते. म्हणून त्यांना अर्धनारी नटेश्वर म्हटले जाते. इतिहासात होऊन गेलेल्या राजमाता जिजाऊ, सावित्री, अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी होते. त्यांनी समानतेचा पुरस्कार केला. शिवरायांनी आपल्या सुनांना युद्ध कलेचे शिक्षण दिले. छत्रपती शाहूंनी आपली बहीण यशवंतराव होळकर यांना दिली. तर सावित्रीबाईंनी ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा शिक्षण दिले. कर्तुत्व हेच खरे सौंदर्य असून विज्ञानवादी हा, अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडा. मृत्यूनंतर कोणते जीवन नसून आई वडील हीच खरी दैवते आहेत असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील, प्राध्यापक शिवाजीराव बंडगर, गणेश करे पाटील, नितीन खटके, एड सविता शिंदे, सरपंच लता रिटे यांच्यासह रिटेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांच्यासह रिटेवाडी तरुण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रामदास कोकरे साहेब यांनी केले .तर सूत्रसंचालन प्राध्यापक संजय चौधरी सर यांनी केले.