मोठी बातमी – मकाई निवडणुकीत बागल कुटुंबातील उमेदवार नसण्याची शक्यता ?
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठी बातमी समोर येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आलेली असतानाही अद्यापही बागल कुटुंबियातील एकही उमेदवार तहसील कार्यालय कडे आलेला नसल्यामुळे बागल यांची उमेदवारी आहे का नाही ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सदर निवडणुकीत बागल कुटुंबातून एकही उमेदवार अर्ज भरणार नसल्याची माहिती समोर येत आहे. नेमके काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर बागल गटावर आरोप केल्यानंतर बागल तरीही शांतच होते. त्यांनी कोणत्याही प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. मध्यंतरी विरोधी गटातील संतोष वाळुंजकर यांनी बागल यांच्यावर सहकारी संस्थांमध्ये कर्ज प्रकरणांवरून उमेदवारीला विरोध केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतरही बागल यांनी समोर येत कोणत्याही प्रतिक्रिया दिलेल्या नव्हत्या. नेमकी काही मिनिटे शिल्लक असतानाही अद्याप बागल हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे ते यंदाच्या निवडणुकीत निवडणूक लढणार की नाही हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मकाई निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असताना तसे शक्य झाले नाही. रोज वेगवेगळे घडामोडी घडत आहेत. सुरुवातीला प्राध्यापक झोळ यांनी विरोध दर्शवत मकाई बचाव समिती स्थापना केली. त्यानंतर बजरंग यांचे संतोष वाळुंजकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला तर आता मोहिते पाटील समर्थक हे सक्रिय झाले व निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत अशा परिस्थितीत निवडणूक रंगतदार होईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच बागल यांनी अद्याप उमेदवारी अर्ज भरलेला नसल्याने चर्चांना उधान आले आहे.