कागदपत्रे गहाळ करून जाणीवपूर्वक छाननी दिवशी उमेदवारी अर्ज बाद केले ; पुढे दाद मागणार
करमाळा प्रतिनिधी
श्री.मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमचे उमेदवारी अर्ज जाणीवपूर्वक अवैध केले असून याच्या विरोधात आम्ही साखर सहसंचालक सोलापूर यांच्याकडे अपील दाखल केले आहे. जर सहसंचालक यांनी आमचे अर्ज अवैध ठरले तर आम्ही न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली असल्याची माहिती मकाई बचाव समितीचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी दिली आहे. यावेळी बागल विरोधात लढणाऱ्या पॅनलचे नाव ठरले असून श्री मकाई परिवर्तन पॅनल च्या नावाखाली निवडणूक लढणार असल्याची घोषणा यावेळी प्रा.झोळ यांनी केली आहे.

याबाबत भिगवण येथे दत्तकला शिक्षण संस्था येथे मकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीबाबत त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिनाथ चे माजी अध्यक्ष वामनराव बदे ,लालासाहेब जगताप, रवींद्र गोडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना रामदास झोळ म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आमच्या उमेदवारी अर्ज भरताना जी कागदपत्र जोडली होती. ती कागदपत्रे गहाळ करून जाणीवपूर्वक छाननी दिवशी उमेदवारी अर्ज बाद केले आहेत. हे बागल गटाने जाणीवपूर्वक केले आहे. बागल गटाकडुन रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी उमेदवारी अर्ज दाखल का केला नाही याचे उत्तर आधी बागलांनी द्यावे.
यावेळी बोलताना वामनराव बदे म्हणाले, की बागलांना जनतेसमोर जायला तोंड नाही. म्हणून त्यांनी खोटे नाट्य करून अधिकारी मॅनेज करून उमेदवारी अर्ज बाद केले आहेत. हे जर खऱ्या अर्थाने सभासदांचे हित पाहत असतील तर त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीला सामोरे जावे.