कारखान्याचा बंद असलेला डिजेल पंप पुन्हा सुरु ; पत्रकारांच्या हस्ते उद्घाटन
करमाळा, प्रतिनिधी –
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या डिझेल पंपावरून सभासदांसाठी डिझेल विक्री सुरू झाली असून याचा फायदा सभासदांनी घ्यावा, असे आवाहन पत्रकार संघाचे सहसचिव अशपाक सय्यद यांनी केले आहे.

आदिनाथच्या कार्यस्थळावरून आज डिझेल विक्रीचा शुभारंभ अशपाक सय्यद यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व प्रमुख पत्रकारांच्या हस्ते या डिझेल पंपाची सुरुवात करण्यात आली. पत्रकार जयंत दळवी, सिद्धार्थ वाघमारे, सचिन जव्हेरी, नागेश चेंडगे, विशाल घोलप, अशोक मुरूमकर, शितलकुमार मोटे, विशाल परदेशी, ओंकार गायकवाड, हर्षवर्धन गाडे, सुनील भोसले यावेळी कारखान्याचे प्रशासकीय संचालक महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत व सत्कार केला.

यावेळी बोलताना अशपाक सय्यद म्हणाले की, आदीनाथ कारखाना हे सहकाराचे मंदिर असून शासनाने नियुक्त केलेले प्रशासकीय मंडळ अत्यंत पारदर्शक कारभार करत आहे. अत्यंत काटकसरीने कारभार करून त्यांनी कारखाना गाळपासाठी सज्ज केला आहे. गतवर्षीचे आदिनाथ कारखान्याने सर्व पेमेंट दिले आहे. ऊस वाहतूकदारांचे राहिलेले पेमेंट लवकरच देणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर होत आहेत. कारखाना डिसलरी प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रशासकीय संचालक मंडळ प्रयत्न करत असल्यामुळे सभासदात उत्साहाचे वातावरण आहे.
यावर्षी आदिनाथ ने चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करावे. यासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कारखाना समजून प्रत्येकानी या कारखान्याला ऊस घालावा, असे आवाहन पत्रकार संघाचे सहसचिव अशपाक सय्यद यांनी केले.
सर्व पत्रकारांचे आभार कार्यकारी संचालक बागनवर यांनी मानले.
आदिनाथ साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना काटा पेमेंट रक्कम द्यावी व ऊस वाहतुकीची बिल रोखीने द्यावी हे दोन गोष्टीचे पथ्य पाळले तर आदिनाथला ऊस कमी पडणार नाही यासाठी संचालक मंडळांनी काम करावे.
-विशाल घोलप,
पत्रकार, करमाळा.