आदिनाथच्या नावावर राजकारण थांबेना; “मला वाचवा” अशी कारखान्याची आर्त हाक
करमाळा :

एकेकाळी हजारो शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या जीवनाचा आधार असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना आज बंद अवस्थेत असून निलावाच्या मार्गावर पोहोचला आहे. मात्र एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही कारखान्याच्या नावावर सुरू असलेले राजकारण थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कारखाना पुन्हा सुरू करून शेतकरी, सभासद आणि कामगारांचे भविष्य कसे वाचवता येईल यावर चर्चा होणे अपेक्षित असताना, अनेकजण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच व्यस्त असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे “राजकारण बाजूला ठेवा आणि मला वाचवा,” अशी जणू आर्त हाकच आदिनाथ देत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

मागील अनेक वर्षांपासून कारखाना आर्थिक अडचणीत सापडत गेला. चुकीचे नियोजन, वाढते कर्ज, अंतर्गत वाद, राजकीय हस्तक्षेप आणि परस्पर विरोध यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत गेली. यामध्ये सत्ताधाऱ्यांसोबतच कारखाना बंद पडावा यासाठी अप्रत्यक्षपणे अडथळे निर्माण करणारे घटकही तितकेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
आज परिस्थिती अशी आहे की, कारखान्याच्या जमिनी, यंत्रसामग्री आणि इतर मालमत्ता निलावाच्या प्रक्रियेकडे जात आहेत. विशेष म्हणजे, निलाव झाल्यानंतरही बँकांचे पूर्ण कर्ज वसूल होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत कारखाना वाचवण्यासाठी ठोस उपाययोजना होण्याची गरज असताना प्रत्येक जण आपापल्या राजकीय भूमिका मजबूत करण्यात गुंतल्याचे दिसत आहे.

शासनाने प्रशासक नेमून कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यातून अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत. दरम्यान, विविध नेत्यांनी कारखाना परिसरात येऊन मोठमोठी आश्वासने दिली, बैठका घेतल्या, मंत्रालय स्तरावर चर्चाही झाल्या. तरीही कारखाना प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी आवश्यक ठोस निर्णय आणि एकमत अद्याप दिसून आलेले नाही.
यामुळे आता सर्वसामान्य शेतकरी, सभासद आणि कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “आपण चांगले करू शकत नसू तर निदान एकमेकांचे पाय तरी ओढू नका,” अशी भावना व्यक्त होत असून, सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून आदिनाथ पुन्हा उभा करण्यासाठी एकत्र येण्याची मागणी होत आहे.
आता तरी संबंधितांनी आत्मपरीक्षण करून कारखाना वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.


