करमाळाकृषीताज्या घडामोडीसहकारसाखरउद्योगसोलापूर जिल्हासोलापूर शहर

वीजेचा लपंडाव – बोरगांव व परिसरातील शेतकरी मेटाकुटिला ; निवडणूक काळात हेलपाटे मारणारे नेते गायब !

करमाळा समाचार

आधीच इंधन दरवाढ आणि इंधन तुटवड्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना आता महावितरणकडूनही शेतकऱ्यांना अपुरी वीजपुरवठा केली जात असल्याने शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. अशा कठीण परिस्थितीत जनतेच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी सर्वच लोकप्रतिनिधी मात्र गायब झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. निवडणुकांच्या काळात वारंवार गावोगावी फिरणारे नेते आता मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप वाढत असून करमाळा शहरात पुन्हा एकदा रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

मागील दोन महिन्यांपासून महावितरणकडून बोरगाव, वाघाचीवाडी, दिलमेश्वर व परिसरातील गावांना केवळ सहा तास वीजपुरवठा केला जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. नदीमध्ये डोळ्यासमोर पाणी असतानाही अपुऱ्या विजेमुळे ते पाणी शेतात उपसता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. इंधनाच्या साहाय्याने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला तरी इंधन महाग झाले असून अनेक ठिकाणी तुटवडाही जाणवत असल्याने शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे ठाकले आहे.

रक्ताचे पाणी करून जगवलेले पीक टिकवणे हेच सध्या मोठे आव्हान बनले आहे. सहा तासांची वीजही नियमित आणि नीटनेटकी मिळत नसल्याने शेतकरी वैतागून गेला असून आठवड्यातून दोन दिवसदेखील व्यवस्थित वीज मिळत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. उद्या पिके जळून गेली तर शेतकऱ्यांचे कर्ज कोण फेडणार वीज बिल कोण भरणार असे अनेक प्रश्न आहेत.

ad

दरम्यान, या प्रश्नासाठी मागील काळात दोन ते तीन आंदोलने करण्यात आली. शेकडो शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले होते. मात्र आजपर्यंत या प्रश्नावर कोणताही ठोस निर्णय झालेला दिसून आलेला नाही. काही दिवसांनंतर नदीतील पाणीही आटण्याची शक्यता असताना, सध्या उपलब्ध असलेले पाणी देखील वापरता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

“नदी आणि नदीचे पाणी उशाला, पण घशाला कोरड” अशी परिस्थिती सध्या परिसरात निर्माण झाली असून शेतीपिकांसह जनावरांचेही हाल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता जनावरांसह करमाळा शहरात रस्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत शेतकरी असून यासंदर्भात आज निवेदने देण्यात येणार असल्याची माहिती बोरगाव येथील शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE