करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश; 15 मिनिटांत कारवाई

करमाळा, दि. 20 जून :

करमाळा तालुक्यातील पोथरे येथे होणारा बालविवाह करमाळा पोलिसांच्या निर्भया पथकाने वेळेत हस्तक्षेप करून रोखला. डायल 112 वर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 15 मिनिटांत घटनास्थळी पोहोचून कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोथरे येथील आनंदी लॉन्स मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा साखरपुडा व विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळताच करमाळा पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार बापूसाहेब कोकोटे यांनी निर्भया पथकाला कळविले. वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मुलगी, मुलगा व त्यांच्या पालकांची चौकशी केली. त्यानंतर विवाह सोहळा तात्काळ स्थगित करून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले. तिच्या पालकांचे जबाब नोंदविण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अंतर्गत मार्गदर्शन केले. मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करता येत नाही, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, अशी माहिती देण्यात आली.

दरम्यान, अल्पवयीन मुलीला पुढील संरक्षण व समुपदेशनासाठी बाल कल्याण समिती, सोलापूर येथे हजर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निर्भया पथकातील महिला पोलीस कर्मचारी व करमाळा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE