करमाळाताज्या घडामोडीराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पुन्हा पडझडीच्या उंबरठ्यावर राष्ट्रवादी (श. प.) ; ‘प्लॅन बी’ची गरज अधोरेखित

करमाळा समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (श. प. गट ) पुन्हा एकदा पडझड पाहायला मिळत असून तालुक्यात सध्या राष्ट्रवादीचा झेंडा हातात धरून गड सर करणारा नेता दिसून येत नसल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादीला नवा शोध घ्यावा लागू शकतो. तर सध्या राजकीय परिस्थितीनुसार प्लॅन बी तयार असणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या बदलत्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.

यापूर्वीही बागल गटाने अचानक राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या भरोशावर राष्ट्रवादी उरलेली दिसून आली होती. त्यामुळे अचानक झालेल्या पडझडीमुळे राष्ट्रवादीला अडचणींचा सामना करावा लागला होता. याशिवाय माजी आमदार संजय मामा शिंदे यांनीही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलेली दिसून आली. तशीच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने आतापासूनच राष्ट्रवादीने प्लॅन बी तयार करणे गरजेचे आहे.

मागील विधानसभा निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली विजय संपादित केला. परंतु तिथून पुढे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकात मात्र आमदार पाटील यांनी राष्ट्रवादी ऐवजी अपक्ष निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय आदिनाथ कारखान्यावरून त्यांच्यात व राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्यात अपेक्षेप्रमाणे अलबेल नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही धूसपूस चालूच राहील. याशिवाय विद्यमान आमदार पाटील यांची शिवसेना भाजप यांच्याशी असलेली जवळीक व खा. धैर्यशील मोहिते पाटलांसोबत बिनसलेले राजकारण यामुळे सध्या तरी आ. पाटील राष्ट्रवादी शिवाय भूमिका घेतील अशी शक्यता दिसून येऊ लागली आहे.

त्यामुळे अचानक राष्ट्रवादीला नव्या आधाराची गरज भासू शकते. त्यामुळे त्यांनी आतापासूनच येणाऱ्या निवडणुकांसाठी प्लॅनिंग तयार करून नव्या उमेदीच्या तयारी सुरू करण्यास हरकत नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये बाजार समितीचे माजी सदस्य तसेच राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष संतोष वारे यांचे नाव आघाडीवर येण्याची शक्यता आहे. सध्या त्यांनी तालुक्यात स्वतःचा चाहता वर्ग तयार केला असून तालुका राष्ट्रवादी कार्यकर्ते व तालुका योग्य पद्धतीने हाताळण्यात संतोष वारे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादीने आतापासूनच प्लॅन बी सक्रिय करत राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देत काम करण्यास सुरुवात करणे अपेक्षित आहे. अचानक नव्याने लाभलेले उमेदवार हे राष्ट्रवादीला गड सर करण्यास मदत करतील असे नाही. पण सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडे एकही तुल्यबळ नेता नसल्याने युवा चेहऱ्याला बळकटी देणे गरजेचे आहे. मुळातच राष्ट्रवादी सध्या डळमळीत झालेली असून आणि विरोधकांना वारे सारख्या युवा नेत्यांची गरज असल्याने त्यांनाही आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याआधी संतोष वारे यांचा योग्य सन्मान केल्यास याचा फायदा दोघांना होताना दिसेल.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE