करमाळ्याच्या पाण्यावर बाहेरचा डोळा; नेत्यांना सहा महिन्यांनी जाग
करमाळा समाचार

आता कुठेतरी निवडणुका संपल्या असून इथून पुढे करमाळा तालुक्यातील पूढार्यांना तालुक्यातून मांगी येथील पाणी बाहेर जात आहे, त्यासाठी लढावे लागेल याची आठवण झालेली दिसून येत आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी संबंधित नियोजन जाहीर झालेले असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच विधान परिषदा निवडणुका या अडसर ठरत होत्या का? हा प्रश्न पडत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात कोणालाच जाग आली नव्हती. असो उशिरा का होईना या विषयात राजकारण्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

मागील डिसेंबर महिन्यामध्ये मांगी तलावातून हळगाव येथे जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून पिण्यासह पीक प्रात्यक्षिकास होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेस तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात तालुक्याचे आमदार नारायण पाटील यांना कल्पना न देताच नियोजन झालेय हे उत्तर हस्यास्पद वाटत आहे. आता ते अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहेत. तर भाजपा नेत्या रश्मी बागल यांनी मागेच हा प्रश्न लाऊन धरू असे सांगितले होते पण पुढे काय झाले हे अजून कळलेले नाही. शिवाय माजी आमदार संजयमामा शिंदे यांची भूमिका तर स्पष्टच नाही वैयक्तिक गोपनीय पद्धतीने तालुक्याचे प्रश्न सोडवत असतील तर ते माहित नाही.
आधीच मांगी प्रकल्पातील पाणीवाटप पूर्ण झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना आधीच पाणी उपलब्ध होत नाही. शिवाय ज्या योजना मधून मांगी प्रकल्पात पाणी आणले जाते त्या योजनेतुन आधीच पाणी मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना हालाखीची परिस्थितीतून जावे लागत आहे. त्यातच संबंधित योजना मांगी प्रकल्पाच्या माथी मारणे चुकीचे आहे. त्यात आपल्या नेत्यांना वरिष्ठाना विरोध करणे जमणार आहे का? एक एक करत सगळेच सत्ताधाऱ्यांच्या दावणीला आहेत. मग आवाज कोण उठवणार?

यामुळे मांगी व परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यासाठी आधी मांगी प्रकल्पाची क्षमता वाढवा व त्याच्यात पाणी आणून त्याचे वाटप करा अशी आपली मागणी असली पाहिजे. आधीच पुरग्रस्त परिस्थिती मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा पद्धतीने भुमिका घेताना करमाळावासियांना विचारात घेणे गरजेचे होते.
नेमके प्रकरण काय आहे …
जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना राबवण्यास तत्वतः मान्यता मिळाली असल्याची डिसेंबर 2025 मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. तेव्हापासून मांगी प्रकल्पावर आधारित शेतकऱ्यांवर असंतोष निर्माण झाला आहे. सदर बैठकीला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते. बैठकीत मागील मध्यम प्रकल्पातून महाविद्यालयास पिण्यासाठी 0.036 दशलक्ष घनमीटर व प्रक्षेत्र सिंचनाखाली 0.41 दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्यास मान्यता देण्यात दिली आहे.

