जातेगावातील चेन स्नॅचिंगप्रकरणी श्रीरामपूरच्या चौघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
करमाळा समाचार

जातेगाव येथे सकाळी दहाच्या सुमारास रस्त्यावरून जात असताना महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठण हिसकावून गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यातील संशयित आरोपींना कोर्टी ग्रामस्थांच्या माध्यमातून पोलिसांनी पकडले होते. त्यांना करमाळा न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरचे आरोपी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील आहेत.

करमाळा तालुक्यात बऱ्याच वेळा रस्त्यावरील लुटीचे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये तालुक्यासह आसपासच्या जिल्ह्यातील भामट्यांचा समावेश असतो. बऱ्याच वेळा सदरचे चोर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. यंदाही तसाच प्रकार घडला असून करमाळा अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या जातेगाव येथे हा प्रकार घडला होता. महिला सकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावरून जात असताना तिच्या गळ्यातील दुचाकी वरील युवकांनी हिसकावून नेले. सुदैवाने मोठा अपघात घडला नाही. गळ्यातील हिसकावताना कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो.
कष्ट करून जगण्यापेक्षा मौज मजा व चैनीचे जीवन जगण्यासाठी तरुणाई सध्या भरकटत चालली असून त्याचा फटका शेतकरी, महिला व वृद्धांना बसताना दिसत आहे. संबंधित भामटे कुठेही चोऱ्या करून निघून जातात पण याने संबंधित कुटुंबाला आणखी काही वर्ष मागे टाकण्यासारखे आहे. अशा चोरांवरील कायदे कडक करण्याची गरज आली असून त्यांच्यात कायद्याचा धाक उरला नसल्याने त्यांनी अशा पद्धतीने वाम मार्गाकडे वळालेले दिसत आहेत.

सदर चोरी प्रकरणात राहुल माणिक आमराव वय 30, अजय संजय पंडित वय 21, मनोज दत्तू जामदार वय 21, निलेश बाबासाहेब भोसले वय 34 सर्व रा.अशोक नगर, निपाणी, वडगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर असे पकडण्यात आलेल्या संशयीत चोरांची नावे आहेत. पुढील तपास हवालदार अझर शेख करीत आहेत.

